
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर असून आता फक्त दोन दिवस उरले आहेत. मात्र अद्यापही युती आणि आघाडीचे उमेदवार गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यास उमेदवारांची धावपळ होणार आहे.
मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये कोणता पक्ष कोणाशी युती करणार हे चित्र बऱयापैकी स्पष्ट झाले आहे, मात्र जागावाटपावर अजूनही खलबते सुरू आहेत. त्यामुळे जागावाटप जाहीर होऊ शकलेले नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पूर्ण तयारी करून बसलेल्या इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे.
आजचा दिवस निर्णायक
30 डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सोमवारी सर्व पक्षांना आपापले जागावाटपाचे अधिकृत आकडे व जागा जाहीर कराव्या लागणार आहेत. तसेच शेवटच्या क्षणी गडबड होऊ नये म्हणून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटपही उद्याच करावे लागणार आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व आणि उमेदवारांसाठी उद्याचा दिवस निर्णायक ठरणार आहे.
मुंबईत महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असून या निवडणुकीसाठी लागणाऱया ईव्हीएम दाखल झाल्या आहेत. कांदिवली येथील सेंटरवर मशीनची तपासणी करण्यात आली.
‘मंगल’वारचा मुहूर्त साधणार!
उमेदवारी निश्चित असलेल्या अनेकांना पक्षाकडून हिरवा पंदील दाखवण्यात आला आहे. मात्र चांगल्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याकडे अनेकांचा कल असतो. 30 डिसेंबरला मंगळवार आहे. त्याच दिवशी स्मार्त एकादशीदेखील आहे. त्यामुळे बहुतेक उमेदवार हा ‘मंगल’वारचा मुहूर्त साधतील, अशीच शक्यता आहे.



























































