
>> दिलीप जोशी
स्वरलता आजच नव्वद वर्षांची होतेय. म्हणजेच अवीट गोडीने सप्तसूर आळवणारा कंठ नव्वदी पार करतोय. लता मंगेशकर या नावापुढे विशेषणं वगैरे लावण्यात अर्थ नाही. ती स्वतःच एक चिरंतन विशेषण झाली आहे. खरं तर नव्वदीच्या व्यक्तीचा उल्लेख ‘अहो’ असाच कराययला हवा, कारण हे वय आजी-पणजी होण्याचं, पण लतादीदींची ओळख म्हणजे त्यांचे सूर आणि स्वर. ते तर तरुणच आहेत. ‘त्रिदश’ असलेल्या ईश्वरासारखे. म्हणून तर देवाचा उल्लेख आपण एकेरी करतो. त्यात आत्मीयता, आपलेपणा असतो. सूरमयी लताचं तसं आहे. नव्वदी पार करणाऱया लता दीनानाथ मंगेशकर या भारतरत्न आणि आता ‘राष्ट्रकन्या’ झालेल्या जागतिक कीर्तीच्या आदरणीय व्यक्ती आहेत… पण रसिकांच्या मनातला रुंजी घालणारा अमर स्वर लताचा आहे. मागच्या चार-पाच पिढय़ांचे कान त्या स्वराने केवळ तृप्तच नव्हे तर समृद्ध केले आहेत.
तृप्तीबरोबरच पुन्हा तृष्णा वाढवणारा हा अवीट गोडीचा स्वर केवळ अलौकिक आहे. त्यांचं गाणं ऐकताना आपण इतर सर्वकाही विसरून जातो हे त्या स्वराचं यश. ही स्वरसिद्धी लतादीदींना उपजत असली तरी त्यांनी अत्यंत विचारपूर्वक आणि परिश्रमाने ती जपली आहे. विविध भाषांमधली गाणी गाताना, त्यांची निवड करताना त्यातील आशय आणि चित्रीकरणाचं दृश्य कसं असणार आहे याची माहिती घेऊन त्या गातात. त्यामुळे चित्रपटकथेतील मधुबाला, मीनाकुमारीपासून ते माधुरी दीक्षित आणि त्यानंतरच्या अभिनेत्रींनाही त्यांचा स्वर साजेसा वाटतो. असा हा अद्वितीय स्वर संगीतकार गुलाम हैदर यांनी हेरला आणि लता मंगेशकर हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य करू लागलं. हैदर यांनी निर्माते शशिधर मुखर्जी यांना लताचं गाणं पहिल्यांदा ऐकवलं तेव्हा ‘हा पातळ आवाज माझ्या चित्रपटाच्या नायिकेला चालणार नाही’ असं मुखर्जी म्हणाले. गुलाम हैदर यांना मात्र दीदींच्या आवाजाविषयी कमालीचा विश्वास होता. त्यांनी भाकीत केलं की, लताचाच स्वर एक दिवस हिंदी सिनेसृष्टी गाजवेल. त्यांचे शब्द तंतोतंत खरे ठरले.
ऐंशी-पंच्याऐंशी वर्षे तेवढय़ाच ताकदीने सुरेल गाण्याची किमया हे एक जागतिक आश्चर्य आहे. त्यांच्या स्वरांची मोहिनी आजच्या दहा-बारा वर्षांच्या गायकानाही मोहवते हे अनेक ‘गान स्पर्धां’मधून सातत्याने दिसून आलंय. दीदींची जुनी गाणी नवी पिढी तितक्याच आत्मीयतेने आठवतेय. याचाच अर्थ ती गाणी ‘जुनी’ केवळ कालक्रमाने झालीयत. स्वर तरुणच आहेत. संगीतकार कल्याणजी एकदा आफ्रिकेला गेले असताना कम्पालाजवळच्या एका घरात त्यांना लतादीदींचा फोटो दिसला. तो आफ्रिकन म्हणाला, या माझ्यासाठी लता ‘मामा’ (आई) आहे… आणि ‘दीदी’च्या ‘पखं होते तो उड आती रे’ या गाण्यावर तो नाचू लागला. दीदींच्या वैश्विक सुरांना मिळालेली ही दाद सारं काही सांगून जाते. हा नव्वदीचा स्वर शतायुषी व्हावा. आपलं जीवन सूर समृद्ध करणाऱया दीदींना सांगावसं वाटतं …आम्ही कृतज्ञ आहोत!


























































