
मागील आठ दिवसांपासून ब्रीच कॅन्डी रुग्णालयात असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती सुधारत आहे. लतादीदी सध्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असल्या तरी त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे. दीदींच्या चाहत्यांसाठी ही खूशखबरच आहे.
लता मंगेशकर यांना 11 नोव्हेंबर रोजी श्वसनाचा त्रास आणि न्युमोनिया या दोन कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दीदींना आयसीयूत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉ. प्रतित समधानी त्यांच्यावर उपचार करीत आहेत. मात्र आज त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आल्याची माहिती त्यांची भाची रचना खडीकर- शहा यांनी दिली. दीदींसाठी जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थना- सदिच्छांबद्दल शहा यांनी मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने आभार मानले.
लतादीदींची प्रकृती उत्तम असून डॉक्टर त्यांना घरी नेण्यास कधी परवानगी देतात, याच्या प्रतीक्षेत आम्ही असल्याचे दीदींच्या भगिनी आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी सांगितले. दीर्दीच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरत आहेत. त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. अफवांना प्रतिसाद देण्याऐवजी दीदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन मंगेशकर कुटुंबीयांनी केले.
























































