
अहमदपूर तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह 19 ऑक्टोबर रोजी गावातील विहिरीत आढळला. मयताच्या नातेवाईकांनी शारीरिक व मानसिक त्रास देत घातपात केल्याचा आरोप केला आहे.
मौजे टेंभुर्णी ता.अहमदपूर येथील जेसीबी चालक कोंडीबा श्रीपती कासले (19 वर्ष) हा दिनांक 16 ऑक्टोबर पासून बेपत्ता होता.त्याच्या नातेवाईकांनी तशी तक्रारही दिली होती.
19 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता गावालगत असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.त्यानंतर मयताची आई शशीकला श्रीपती कासले यांनी
पोलीसात तक्रार दाखल केली असून यात म्हटले आहे की, गावातील एका मुली सोबत कोंडीबाचे प्रेम संबध होते.यातून दोन वेळा दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. 16 ऑक्टोबर रोजी कोंडीबा हा घराबाहेरील शेडमधे एकटाच झोपला होता. मध्यरात्री एक वाजता त्यांचा भाऊ घरी आला असता कोंडीबा झोपलेल्या ठिकाणी त्याचा मोबाईल व चप्पल आढळून आल्याने त्यांनी घरात झोपलेल्या व्यक्तींना ही माहिती दिली. या प्रकरणी 17 ऑक्टोबर रोजी कोडिंबाच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार अहमदपूर पोलिसात दिली.
या प्रकरणी मयताची आई शशीकला कासले यांच्या फिर्यादीवरून देवानंद मनोहर गायकवाड, सुहास खंडेराव गायकवाड, एकनाथ निवृत्ती गायकवाड सर्व( रा. टेंभुर्णी.ता.अहमदपूर) अक्षय जळबा गायकवाड( रा. मोहिजा परंडा ता. कंधार ) विश्वंभर गणपती मसुरे, मुलीचा मावस भाऊ ( रा.हाळी ता.उदगीर) यांच्या विरोधात अहमदपूर पाेलीस ठाण्यात कलम 306, 323, 506, 34 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.मयताच्या नातेवाईकांनी संशयित आरोपीस अटक झाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका घेत मृतदेह ग्रामीण रूग्णालयासमोर वाहनात ठेवला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी विरोधात गुन्हा नोंद व आरोपींना अटक होई पर्यंत शवविच्छेदन व अंतविधी करणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने कांही काळ तणाव निर्माण झाला होता.गुन्हा नोंद व आरोपींना अटक झाल्यावर मृतदेह गावी नेऊन अंत्यविधी करण्यात आला.


































































