धक्कादायक! वाहतूक पोलिसाला मारहाण, तोंडावर ठोसा मारुन दात पाडला

शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास दोघा युवकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना लातुरात समोर आली आहे. तरुणांनी पोलिसाच्या तोंडावर ठोसा मारुन त्याचा दात पाडला. या प्रकरणी दोघांविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाण प्रकरणी वाहतूक पोलीसल मुन्वरखाँ तैमुखॉ पठाण यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, गुळ मार्केटकडे चालत जात असताना जी.एस.टी कार्यालयासमोर त्यांनी एका मोटार सायकलस्वारास थांबवले. त्याला गाडीची कागदपत्रे, वाहन चालवण्याचा परवाना मागितला. त्यांनी कागदपत्रे दाखवली. गाडीचा विमा संपलेला होता, त्याचप्रमाणे गाडीची नंबर प्लेट ही फॅन्सी होती म्हणून त्यांना दंड भरा असे सांगितले. दुचाकीस्वार अशोक नवनाथ भिसे याने दंड भरण्यास नकार दिला व माझी गाडी का अडवली म्हणून हुज्जत घातली. त्याच्यासोबतचा सुनील नानासाहेब ओहाळ याने तुला कागदपत्र तपासायचा काय अधिकार असे म्हणून म्हणत दमदाटी केली.

दरम्यान ,पठाण यांनी त्यांचे इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतले. अशोक भिसे याला धरुन पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने तुम्ही माझ्या अंगाला का हात लावता म्हणून हात हिसकावला आणि धक्काबुक्की केली. तोंडावर एक जोराचा ठोसा लगावला. त्यामुळे पठाण यांचा एक दात पडला. यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेऊन त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केला, धक्काबुक्की, मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या