
लातूर जिल्ह्यातील औसा येथे भुईकोट किल्ला आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असणार्या या किल्ल्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमण काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून करूनही ती प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते.
महाराष्ट्राची ओळख पर्यटनामध्ये आहे. ती गड-किल्ले यांच्यामुळे एकापेक्षा एक असे सुंदर गड किल्ले राज्यात आहेत. लातूर जिल्ह्यातही औसा येथे भुईकोट किल्ला आहे. अतिशय पुरातन असणारा हा भुईकोट किल्ला चालुक्यांच्या काळात बांधला गेला आहे. विक्रमादित्य यांच्या शके 1150 च्या बोरगाव येथील ताम्रपटामध्ये औसा किल्ल्याचा उल्लेख आहे.
किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या सर्व बाजुंनी खंदक आहे. परंतु, सध्या यातील काही भागात शेती करण्यात येत असल्याचे दिसून येते तर किल्ल्याच्या समोरील बाजुच्या खंदकात नागरिकांची वस्ती बसलेली आहे. औसा किल्ल्याच्या डागडुजीचे काम सध्या करण्यात येत आहे. परंतु, त्याचा वेग खूप कमी आहे. किल्ल्यातील साफसफाईकडे दुर्लक्ष असल्याकारणाने परिसरात मोठ्या प्रमाणात गवत, झाडे दिसून येतात. ही झाडेच किल्ल्यासाठी धोकादायक आहेत. ती काढून टाकण्यात आली पाहिजेत.
पुरातत्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या किल्ल्याकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी म्हणून या किल्ल्याचा आजपर्यंत काहीच उपयोग करण्यात आलेला नाही. लातूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी म्हणून किल्ल्याकडे लक्ष देण्यात आले तर एक दिवसाच्या पर्यटनासाठीचा हा एक उत्तम किल्ला आहे. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात पर्यटनासाठीची विशेष अशी काही ठिकाणे नाहीत. जी काही ठिकाणे आहेत ती दुर्लक्षीत आहेत. त्यामध्ये उदगीरचा किल्ला, खरोसा लेणी, हत्तीबेट, वडवळचे संजीवनी बेट यांचा समावेश आहे.
किल्ल्यातील अतिक्रमण काढण्याचे महत्त्वाचे काम करणे आवश्यक असून किल्ल्याची स्वच्छता आणि सफाई आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने लोकसहभाग घेणे आवश्यक आहे. अनेकजण यासाठी पुढाकार घेऊ शकतात. किल्ल्यातील अतिक्रमण काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने केली जाते. या ठिकाणी घरे असणार्यांना इतरत्र घरे देण्यात आली तर हा प्रश्न सहजपणे सुटू शकतो. किल्ल्याभोवतीचा खंदक व्यवस्थीत करण्याचे कामही करावे लागेल. अनेक वैशिष्ट्ये असणारा हा किल्ला आहे. या किल्ल्यातील एका विहिरीमध्ये दोन विहिरी आहेत. जलमहल वैशिष्ट्यपूर्ण आहे.
पुरातत्व विभागाने या किल्ल्याचे मोठे काम आजपर्यंत केलेले आहे परंतु, या किल्ल्यापासून उत्पन्न मात्र मिळालेले नाही. त्यामुळेही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असावे, असे म्हटले जाते. लातूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी म्हणून या किल्ल्याचा उपयोग प्रशासनाने केला तर जिल्ह्यातील पर्यटनात मोठी वाढ होऊ शकते.

























































