
सामना प्रतिनिधी । लातूर
शहरातील चैनसुख रोडवर व्यापाऱ्यास मोटारसायकलवर आलेल्या तिघा युवकांनी लुटल्याची घटना घडली. तब्बल 1 लाख 75 हजार 600 रुपये रोख रक्कमेसह 18 हजार रुपयांचा मोबाईलही हिसकाऊन ते पळून गेले. या प्रकरणी अज्ञात तिघा युवकांविरुध्द पोसिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हत्ते कॉर्नर भागात राहणारे जितेंद्र हनुमानदास तापडिया यांचे धाराशिव जिल्ह्यातील शिराढोण येथे शेती व बिल्डींग मटेरियलचे दुकान आहे. 29 एप्रील रोजी त्यांनी कळंब येथील आडतीवर 90 क्विंंटल सोयाबीन विक्रीसाठी ठेवले होते, त्याची अनामत रक्कम म्हणून त्यांनी 1 लाख 50 हजार रुपये घेतलेले होते. दिवसभराच्या त्यांच्या व्यवसायाची रक्कम 25600 रुपये झाली अशी एकूण 1 लाख 75 हजार 600 रुपये घेऊन ते शिराढोण येथून ट्रकने लातूर शहरातील 5 नंबर चौकात उतरले. तिथून अॅटोरिक्षाने ते शहरातील हनुमान चौकात आले. हनुमान चौकातून घराकडे चैनसुख रोडने चालत जात असताना मोटारसायकल वरुन आलेल्या तिघा युवकांनी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास त्यांना अडवले. त्यांच्याजवळची पैशाची बॅग हिसकावून घेतली. तसे त्यांच्याजवळील 18 हजार रुपयांचा मोबाईलही पळवला. याप्रकरणी पोलीसांनी अज्ञात तिघा युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.

























































