
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथे मुलाचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वडिलांना तलवार लागल्यामुळे जखम झाली. या मारहाण प्रकरणी कासार शिरसी पोलीस ठाण्यात चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलाकर लक्ष्मण टेकाळे (रा. एकोजी मुदगड) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक 11 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता शेतातून घराकडे परत जात असताना रस्त्यावर लोकांची गर्दी दिसली. गर्दी कशाची आहे हे पाहण्यासाठी गेल्यानंतर तिथे फिर्यादीचा मुलगा सुरज कमलाकर टकाळे व मदन बालाजी मुळे, मिलींद बालाजी मुळे यांचे भांडण सुरू होते.
भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर मनोज मुळे याने हातातील दगडाने डोक्यात मारहाण केली व जखमी केले. दयानंद बाबुराव मुळे हा तलवार घेऊन तुम्हाला खल्लास करतो म्हणून आला. त्याच्या हातातील तलवार फिर्यादीची पत्नी बालिका कमलाकर टेकाळे हिने धरुन त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता तलवार फिर्यादीच्या डाव्या हातावर लागली.
मुलगा सुरज टेकाळे यास मदन बालाजी मुळे याने त्याच्या हातातील काठीने उजव्या हाताच्या कोपरावर मारून जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीसांनी मदन मुळे, मिलींद मुळे, मनोज मुळे, दयानंद मुळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

























































