
अहमदपूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडल्याने साठवण तलाव, पाझर तलाव, नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. संततधार पावसाने अहमदपूर तालुक्यातील 14 तलाव तुडुंब भरुन वाहत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांची पिके आता पिवळी पडून वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अहमदपूर तालुक्यातील एकूण 28 साठवण तलावा पैकी 14 तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तालुक्यातील कोपरा साठवण तलाव, नागठाणा, उगीलेवाडी, पाटोदा, अहमदपूर साठवण तलाव ,मोघा, सावरगाव थोट, तांबट सांगवी, हगदळ / गुगदळ, सोनखेड, ढाळेगाव,येस्तार, कावळवाडी, हंगेवाडी हे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.
तालुक्यातील भुतेकरवाडी 78 टक्के, गोताळा 48 टक्के, काळेगाव 49 टक्के, वाकी तलाव 45टक्के, तेलगाव 41टक्के, कौडगाव 48 टक्के, थोडगा 91 टक्के,मावलगाव 81 टक्के, खंडाळी 51 टक्के, नागझरी 61 टक्के, धसवाडी, 97 टक्के, अंधोरी 76 टक्के,मोळवण 54 टक्के,येलदरी 74 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
अहमदपूर तालुक्यात संततधार पावसामुळे पिके धोक्यात
अहमदपूर तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसाने खरीप पिके धोक्यात आली आहेत.गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस पडल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाची तीव्रता अधिक असल्यामुळे कमी कालावधीत अधिक पाऊस पडला आहे. सततच्या पावसाने तुर, मूग, उडीद व सोयाबीन आदी खरीप पिकांना धोका निर्माण झाला असून निसर्गाच्या बदलाने शेतकरी अडचणीत आला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रिमझिम पावसाच्या ओलीवर पेरण्या केल्या होत्या. जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडून या पावसाचे प्रमाण वाढल्याने ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत.
गोगलगायींच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही भागांत तर अक्षरशः अख्खे शेत गोगलगायींनी फस्त केले आहे. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे व गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तालुक्यात कमी कालावधीत जास्त पाऊस
अहमदपूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला असून, सर्वच मंडळात जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अहमदपूर मंडळात आतापर्यंत 546, किनगाव 570, अंधोरी 581, खंडाळी 529, शिरुर ताजबंद 519, हाडोळती 621 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
मागील आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील काही साठवण तलाव, पाझर तलाव भरून वाहत आहेत, प्रशासनाच्या वतीने तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी तालुक्यातील विविध साठवण तलावावर जाऊन पाहणी केली.तसेच शेतकरी, नागरिक व मच्छीमारांनी या तलावावर जाऊ नये अशा सूचना केल्या आहेत.



























































