लातूर जिल्ह्यातील आठ बियाणे, रासायनिक खते व कीटक नाशके विक्री केंद्राचे परवाने रद्दचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

कृषी आयुक्तालयातील भरारी पथकाकडून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राची संयुक्त तपासणी तंत्र अधिकारी किरण जाधव, कृषि अधिकारी तात्यासाहेब कोळेकर, कृषि आयुक्तालय, पुणे व जिल्ह्यातील निरीक्षकाकडून करण्यात आली होती. आठ बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

त्यामध्ये अमित फर्टिलायझर्स व अक्षय फर्टिलायझर्स काटगाव, ता. लातूर श्रवणकुमार कृषि सेवा केंद्र, पिंपळफाटा, ता. रेणापूर, संत ज्ञानेश्वर कृषि सेवा केंद्र व शांताई कृषि सेवा केंद्र, पळशी, ता. रेणापूर, ओमसाई कृषि सेवा केंद्र, नळेगाव, ता.चाकूर व न्यू. सावली कृषि सेवा केंद्र, निलंगा ता. निलंगा या कृषि सेवा केंद्राचा समावेश आहे. या सर्व कृषि सेवा केंद्राचा तपासणी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर या कार्यालयास प्राप्त झाला होता.

तपासणी अहवालानुसार उपरोक्त कृषि सेवा केंद्राची सुनावणी दिनांक 15 जून 2021 रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी आयोजित केली होती. सुनावणी दरम्यान तपासणी अहवालानुसार गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या मध्ये विक्री परवाना दर्शनी जागी न लावणे, बियाणे,रासायनिक खत व कीटकनाशकाचे स्रोत न ठेवणे, साठा रजिस्टर अद्यावत न करणे, साठाफलक व भावफलक प्रदर्शित न करणे.

विक्रीबिलावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी न घेणे, विक्री बिल शेतकऱ्यांना परिपूर्ण न देणे, वजन काटा दुकानात न ठेवणे, विहित कालावधीत नोटीसीचा खुलासा न देणे, इ-पॉस मशीनवरील खत साठा अद्यावत न करणे, खरेदी बिले न ठेवणे.इत्यादी त्रुटी तपासणी वेळी आढळून आल्या होत्या. त्रुटी आढळून आल्यास कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्याचा इशारा परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने यांनी दिला आहे.