
लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमधून सोयाबीनची भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून येत आहे. निलंगा तालूक्यातील पानचिंचोली शिवारात तर सोयाबीनची उंची पाच फुटांपर्यंत वाढलेली आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने शेंगा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन करपू लागलेले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याचे दिसून येत आहे.
कृषी विभागाच्या वतीने मात्र केवळ कांही मोजक्याच ठिकाणी क्षेत्र पाहणी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. गावागावात असणाऱ्या कृषी सहाय्यकांकडून माहिती घ्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. लातूर जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे लवकर पेरणी झाली. पिकांची वाढही चांगली झालेली होती. त्यातच पाऊस लागून राहिला आणि शेतातील सर्व कामे खोळंबली. सतत पडणाऱ्या पावसाने पिकांची उंची भरमसाठ वाढलेली आहे. सोयाबीनची उंची साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत वाढते मात्र लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पानचिंचोली शिवारामध्ये सोयाबीनची उंची पाच फुटांपर्यंत वाढलेली आहे.
जिल्ह्यात अनेक गावांमधून अशीच स्थिती आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेंगाच लागल्या नाहीत, तर काही ठिकाणी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. लातूर तालुक्यातील बामणी, भंडी, भातंगळी, तर रेणापूर तालुक्यातील आनंदवाडी आणि चाकूर तालुक्यातील मुरंबी, सुगाव या गावातील काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आमदार, पालकमंत्री यांच्याकडे गेल्या आणि त्यामुळे कृषी विभागाने या भागातील पिकांची पाहणी तरी केली. शेतकऱ्यांच्या शेतावर सोयाबीनची उभी कायिक वाढ आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्याचे आढळून आले. भारी जमिनीत ज्या ठिकाणी झाडांची गर्दी झाली आहे अशा ठिकाणी जास्तीची उभी कायिक वाढ झाल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढून शेंगाचे प्रामाण 30 टक्कयांनी कमी आढळून आल्याचे कृषी विभागाने मान्य केले आहे.
सोयाबीन पिकाच्या जमिनीलगतच्या भागात आद्रतेचे प्रमाण जास्त झाल्यामुळे खोडावर पानावर आणि काही प्रमाणात शेंगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास आढळून आला. अनेक ठिकाणी सोयाबीन पिकात 30 ते 35 दिवसादरम्यान कीटकनाशकाची फवारणी होणे आवश्यक होते ती न झाल्यामुळे आणि जास्तीची कायिक वाढ झाल्यामुळै चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळी आणि स्पोडोप्टेरा या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानपातळीच्या पुढे आढळून आला. सोयाबीनची अतिरिक्त कायिक वाढ झाल्यामुळे (सोयाबीन माजणे ) सद्य परिस्थितीमध्ये पिकांमध्ये फवारणीसाठी मजूर तयार होत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
चालू वर्षी सुरुवातीपासून पावसाचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहिल्यामुळे तसेच भारी जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता व अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ज्या टप्प्यावर सोयाबीन पिकाची कायिक वाढ थांबणे आवश्यक होते ती न थांबता पुढे वाढत राहिल्यामुळे या वर्षी भारी जमिनीत सोयाबीनची उभी कायिक वाढ जास्त आढळून आली. झाडावरील शेंगाचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून येत आहे.
मागील 10 ते 12 दिवसादरम्यान झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे आणि अतिरिक्त कायिक वाढीमुळे बुरशीजन्य रोग जसे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ज्या ठिकाणी अतिरिक्त वाढ झालेली आहे अशा ठिकाणी मागील 10 ते 12 दिवसापासून फवारणीसाठी मजूर तयार होत नसल्यामुळे फवारणी अभावी किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात सर्वत्र हिच परिस्थिती आढळून येत आहे. परंतू केवळ काही ठिकाणीच कृषी विभाग पोहोचत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कृषी सहाय्यकांकडून कृषी विभागाने माहिती घ्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

























































