भादा परिसरात जनावरांची उपासमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। उटी बु.

भादा परिसरात पाण्याविना दुष्काळपरिस्थिती निर्माण झाली असून पाणी व चाऱ्याविणा दुभत्या जनावरांची उपासमार सुरू आहे. चाऱ्याचे भावही गगनाला भिडले असून ज्वारी, कडबा सुमारे 2000 ते 2500 शेकडा तसेच ऊसाचे वाडे 1000 ते 1500 शेकडा अशा भाव मिळत आहे. हा भाव शेतकरी वर्गाला परवडत नसल्याने जनावरे कशी सांभाळायची हा प्रश्न सतावत आहे.

भादा परिसरात यावर्षी रब्बीची पेरणी झाली नाही. पाण्याअभावी ऊसाचे पीकही वाळून गेले आहेत. यामुळे या परिसरात 1972 च्या दुष्काळापेक्षा यावर्षीचा दुष्काळ भयानक आहे अशी चर्चा सुरू आहे. मात्र शासनाने कुठल्याही प्रकारची अद्याप योजना आखलेली नाही. यामुळे तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागत करत आहेत. मात्र दिवसभर मशागत करून संध्याकाळी बैलांना चारा उपलब्ध कसा करता येईल याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. साठवून ठेवलेले गुळी वैरण संपली आहे. परिणामी या परिसरातील शेतकरी वर्ग दुष्काळाच्या चक्रात सापडलेले दिसत आहेत.