भरपाई द्या मग पाईपलाईन दुरुस्त करा…संतप्त शेतकऱ्यांचा महापौरांना घेराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

रविवारी सायंकाळी लातूर तालूक्यातील मौजे जोडजवळा या ठिकाणी धनेगाव धरणातून लातूर शहरास पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया गेले. या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनीअगोदर नुकसान भरपाई द्यावी व नंतरच पाईपलाईन दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी हे काम अडवले.

लातूर शहरास अगोदरच पाण्याची टंचाई भासत आहे. त्यात रविवारी पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया गेले. या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अगोदर हे नुकसान भरुन द्यावे आणि नंतरच पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम करावे या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज हे काम अडवले. महानगरपालिकेचे अधिकारी, महापौर हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते परंतु अगोदर भरपाई द्यावी या मागणीसाठी ते अडून बसलेले होते. त्यामुळे आजही पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होऊ शकले नाही. या प्रकारामुळे लातूरात पुन्हा दोन – तीन दिवसाची निर्जळी लातूरकरांना सहन करावी लागणार आहे. 10 दिवसाला सध्या पाणी पुरवठा होत आहे. तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.