Latur Rain – लातूर ग्रामीणच्या आमदाराचा पीकपाहणी दौरा शेतकऱ्यांसाठी होता का पर्यटनासाठी? संतप्त पुरग्रस्थांनी नोंदवला निषेद

लातूर तालुक्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वर्षभराची मेहनत या पावसाने हिरावून घेतली आहे. त्यामुळे भविष्याच्या चिंतेत या भागातील शेतकरी अडकला आहे, शासनाकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे. मात्र, ज्यांना निवडून दिलं तेच पर्यटनासाठी यावं, अशा पद्धतीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लातूर तालुक्याचे आमदार रमेश आप्पा कराड यांना जाहीर निषेध नोंदवला.

अधिक माहिती अशी की, पूर ओसरल्यानंतर सोमवारी (29 सप्टेंबर 2025) तांदूळजा आणि कानडी बोरगाव या गावामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्याकरिता आमदारांनी पाहणी दौरा काढला होता. परंतु या पाहणी दौऱ्यात सत्तेचा माज काय असतो ते आमदार रमेश कराड यांनी दाखवून दिलं, अशा संतप्त भावना तांदूळजा व कानडी बोरगाव गावातील ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या. तांदूळजा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोड वरती ताफा थांबवत आमदारांनी पिकांची पाहणी केली. तसेच तांदूळजा येथून जवळ असलेल्या कानडी बोरगाव येथील मांजरा नदीपात्राने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी आमदार गेले. परंतु, पाहणी न करताच पर्यटकासारखे परत निघण्याच्या तयारीत होते. तोच एका शेतकऱ्याने आमदारांपुढे त्याची व्यथा मांडली की, माझी चार एकर जमीन असून त्यात लावलेले सोयाबीन हे पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झालं आहे. मात्र, आमदारांना त्याची दयामया आली नाही आणि त्यांनी शेतकऱ्याला अतिरेक्याचा दर्जा देत पोलिसांना शेतकऱ्याला बाजूला करण्यास सांगितले.

आमदारांनी दौरा गुंडाळला आणि ते पोलीस फौजफाट्यात लातूरच्या दिशेने रवाना झाले. शेतकऱ्यांच्या आशेवर आमदारांनी गाडीत बसूनच पाणी फेरले. यामुळे तांदूळजा व कानडी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की, कराड यांचा दौरा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी होता की, स्वत: च्या पर्यटनासाठी होता. याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार रमेश कराड यांचा जाहीर निषेध नोंदवला आहे. शेतकऱ्याची व्यथा न ऐकता आमदारांनी त्या ठिकाणाहून घेतला काढता पाय? या सत्तारूढ आमदारांचे करायचं काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.