लातूरमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत काढले वाक्सा शाळेमधील अतिक्रमण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील वाक्सा येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेत व वाक्सा-चांदोरी रस्त्यावर केलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढत वाक्सा ग्रामस्थांनी इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. वाक्सा हे निलंगा तालुक्यातील सात सदस्यीय ग्रामपंचायतीचे छोटेसे गाव आहे. गावातील एका महिलेने येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर हक्क दाखवत शाळेची जागा माझी आहे म्हणत गेल्या सहा महिन्यांपासून शाळेच्या जागेवर पत्र्याचे शेड उभारले होते. इतकेच नाही तर सदरील पत्र्याचे शेड उभारण्यासाठी त्या महिलेकडुन जिल्हा परिषद शाळेचे शौचालयही पाडण्यात आले होते.

वाक्सा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने अनेकदा सांगुनही महिला ऐकण्यास तयार नव्हती त्यामुळे ग्रामपंचायतीने जि.प.शाळेच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्याचा ठराव घेतला व सदरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात सोमवारी जेसीबीच्या साह्याने काढुन टाकले.

वाक्सा-चांदोरी मार्गावर रस्त्याशेजारील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करत रस्ता अरुंद केला होता परिणामी वाहन जाणे सुध्दा अशक्य झाले होते त्यामुळे येथील ही अतिक्रमण जेसीबी ने काढत रस्ता मोकळा केला.