लातूरकरांपुढे भीषण जलसंकट! जिल्ह्यातील नदी, नाले अजूनही कोरडे ठाकच

752

राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. लातूर जिल्ह्यात मात्र पावसाअभावी भीषण जलसंकट उभे राहणार असे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अजूनही कोरडे ठाक आहेत. लातूर शहरात आजही महिन्यात केवळ 3 वेळा पाणी पुरवठा होत आहे. पावसाअभावी माळरानावरील पेरणी वाया गेलेलीच आहे. परंतु उत्पादनातही मोठी घट येणार याची कबुली शेतकरी तर देत आहेतच पण शासनाचा कृषी विभागही देत आहे. रब्बी हंगामाची पेरणीही रामभरोसे असल्याचे सध्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रातील कायम दुष्काळी जिल्हा म्हणून आता लातूर जिल्ह्याची ओळख सर्वत्र सांगितली जात आहे. यावर्षी आजपर्यंत 35 टक्केही पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. पावसाअभावी जिल्ह्यातील नद्या, नाले, विहिरी, बोअर कोरडे पडलेले आहेत. भीषण अशा पाण्याच्या टंचाईचा सामना लातूरकरांना करावा लागत आहे. यापुर्वी 2016 मध्ये लातूर शहरास रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता, तशी स्थिती आता पुन्हा निर्माण झालेली आहे.

लातूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची, औद्योगिक वसाहतीची, शेतीची गरज भागते ती बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प धनेगाव येथील पाण्यावर. या प्रकल्पात मृत साठ्यातील केवळ 6.010 दशलक्ष घनमिटर एवढाच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. निम्न तेरणा प्रकल्पात मृतसाठ्यातील 14.036 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. लातूर जिल्ह्यात केवळ 8 मध्यम प्रकल्प आहेत. तावरजा मध्यम प्रकल्प कोरडा आहे. रेणापूर मध्यम प्रकल्प कोरडा आहे. व्हटी मध्यम प्रकल्पात 0.001 दलघमी पाणीसाठा आहे. तीरु मध्यम प्रकल्पात मृतसाठ्यातील 2.280 दलघमी पाणी आहे. देवर्जन प्रकल्पात 0.030 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. साकोळ मध्यम प्रकल्पात मृतसाठ्यातील 1.687 दलघमी पाणीसाठा आहे. घरणी मध्यम प्रकल्पात मृतसाठ्यातील 1.444 दलघमी पाणीसाठा आहे. मसलगा मध्यम प्रकल्पात मृतसाठ्यातील 0.017 दलघमी पाणी उपलब्ध आहे.

लातूर तालूक्यातील गोंदेगाव, वासनगाव, चिकुर्डा, निवळी, कातपूर हे सर्व लघूप्रकल्प कोरडे आहेत. औसा तालुक्यातील चिंचोली जोगण, चिंचोली तपसे, कारला, तुंगी, नणंद, अपचुंदा, सोमदुर्ग, बेलकुंड, सारोळा, माळकोंडजी, वानवडा, येल्लोरी, खुटेंगाव, शिवली साठवण तलावात मिळून 0.034 दलघमी पाणी आहे. उदगीर तालुक्यातील 10 लघू तलावात केवळ 1.592 दलघमी पाणी उपलब्ध आहे. निलंगा तालुक्यातील 10 लघू तलावात केवळ 0.237 दलघमी पाणी उपलब्ध आहे. अहमदपूर तालुक्यातील 29 लघू तलावात केवळ 0.253 दलघमी पाणी उपलब्ध आहे. रेणापूर तालुक्यातील 6 लघू तलावात 0.348 दलघमी पाणी उपलब्ध आहे. चाकूर तालुक्यातील 20 लघू तलावात 0.824 दलघमी पाणी उपलब्ध आहे. देवणी तालुक्यातील 11 लघू तलावात 0.554 दलघमी पाणी उपलब्ध आहे. जळकोट तालुक्यातील 10 लघुतलावामध्ये 0.558 दलघमी पाणी उपलब्ध आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील एका लघूतलावात 0.192 दलघमी पाणी उपलब्ध आहे.

सारोळा- सोनवती ता. लातूर, नागलगाव ता. उदगीर, करखेली ता. उदगीर, सय्यदपूर साठवण तलाव ता. रेणापूर, पाथवरवाडी ता. रेणापूर, चेरा क्र.2 ता. जळकोट, बोळेगाव, केंद्रेवाडी हे साठवण तलाव कोरडे आहेत. दापेगाव ता. औसा, वागदरी साठवण तलाव ता. उदगीर, नागझरी ता. अहमदपूर, केकतसिंदगी ता. जळकोट, डोंगर कोनाळी, घोणसी ता. जळाकोट, साठवण तलाव जोत्याखाली आहे. कावलवाडी ता. अहमदपूर साठवण तलावात 0.180 दलघमी पाणी आहे. रावणकोळा ता. जळकोट साठवण तलावात 0.173 दलघमी पाणी आहे. माळी हिप्परगा साठवणत तलावात 0.684 दलघमी पाणी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या