लातूर – किनगाव परिसरातील जलसाठे तळाला, पाणी टंचाईचं संकट गडद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या तापमानामुळे किनगाव परिसरातील जलसाठे खोलवर गेल्याने किनगाव सह परिसराला पाणी टंचाईचे संकट तीव्रतेने जाणवायला लागले आहे. अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरातील अनेक गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारे मुख्य स्त्रोत रिकामे होण्याच्या मार्गावर असून त्या अधिच परिसराला पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. किनगावला पाणी पुरवठा करणारे स्त्रोत व्हटी साठवण तलाव, कोपरा , हंगेवाडी तसेच कावळवाडी साठवण तलाव हे मुख्य असून या सर्वच साठवण तलावाची पाणी पातळी कमी झाल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

प्राण्यांना सुद्धा याची झळ प्रखरतेने जाणवत असल्याची दिसत आहे. या हंगामातील पाऊस अत्यल्प झाल्याने तलावातील पाणी पातळीत म्हणावी तशी वाढ झाली नव्हती. त्या मूळे साठवण तलावासह पाझर तलाव, विहिरी, कूपनलिका यांच्या पाणी पातळीत सुद्धा म्हणावी तशी वाढ झाली नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीला सुद्धा पाणी पुरवठा कमी पडला. त्या मुळे शेतकऱ्यांना अल्प उत्पादनातच समाधान मानावे लागले. या वर्षी उन्हाळ्याच्या तोंडावरच फेब्रुवारी – मार्च महिन्यातच उन्हाळ्याची अधिक तीव्रता वाढत असल्याने रब्बीतील ज्वारी पिक कणसात येण्या पूर्वीच उन्हामुळे वाळून गेल्याचे चित्र परिसरात सर्वत्र दिसत आहे.