कोविडचे निर्बंध मोडून लग्न समारंभ, 50 हजार रुपयाचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यात वाढत जाणारा कोरोना संसर्ग लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभासाठी 25 व्यक्तींची मर्यादा घातली आहे. सदरील आदेश मोडून लग्न समारंभ करणाऱ्या देवणी तालुक्यातील तळेगाव (भो) येथील वधु पित्यास 50,00 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध जारी केले आहेत. पूर्वनियोजित लग्न व त्याअनुषंगीक समारंभास 25 व्यक्तीची मर्यादा घालून दिली आहे. तसेच लग्न समारंभास स्वगृही पार पाडण्याचे आदेश दिलेले आहेत. देवणी तालुक्यातील तळेगाव (भो) येथे 26 एप्रिल रोजी राम गोविंद बिरादार यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मोठा मंडप टाकला होता. सदरील लग्न समारंभास 300पेक्षा अधिक लोकांना आमंत्रित केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. ग्रामसेवक तळेगाव (भो) यांनी शासन आदेशाप्रमाणे 50,000 रुपये दंड राम गोविंद बिरादार यांच्याकडून वसूल केला. या रक्कमेचा विनीयोग कोविड प्रतिबंधक उपाययोजनेसाठी करणार असल्याचे तहसीलदार देवणी यांनी कळविले आहे.