Latur News – भरधाव एसटीची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

भरधाव एसटीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लातूरमध्ये घडली. निलंगा औसा रोडवरील निंबाळकर पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सकाळी 11.55 वाजता ही घटना घडली. हबीब हसन शेख (32) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण हा निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील रहिवासी असून, तो मिस्त्री काम करून आपली उपजीविका करत होता. गुरुवारी मयत तरुणाच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना निलंगा शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मयत तरुण हा दुचाकीवरून निलंगा येथे आपल्या वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात असतानाच औसा मार्गावरून निलंगाच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या निलंगा-लातूर एसटीने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर एसटी बसचालक घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.