Latur News – भररस्त्यात कार अडवून तरुणाची चाकूने भोसकून हत्या, महिला गंभीर जखमी

लातूरमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. भररस्त्यात कार अडवून तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना लातूर शहरात घडली. अनमोल अनिल केवटे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात कारमधील महिला गंभीर जखमी झाली आहे. सोनाली भोसले असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेला उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली भोसले व अनमोल केवटे हे दोघेही सोलापूरचे रहिवासी असून लातूर येथे एका संघटनेच्या अधिवेशनाला आले होते. अधिवेशन आटोपून दोघेही इर्टिगा कारने सोलापूरला परतत होते. यादरम्यान बुधवारी मध्यरात्री 12.45 वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील रिंग रोजवर क्रुझर गाडी आडवी लावून त्यांची कार रोखण्यात आली. यानंतर क्रूझरमधून आलेल्या दोघांनी अनमोल आणि सोनाली यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. यात अनमोलचा मृत्यू झाला तर सोनाली गंभीर जखमी झाली.

हल्लेखोरांनी अनमोलच्या मानेवर, हातावर चाकूने सपासप वार केले. त्यात तो जागीच ठार झाला. सोनालीच्या पोटावर-पाठीवर अनेक वार करण्यात आले असून यात ती गंभीररित्या जखमी झाली. याप्रकरणी इर्टिगा गाडीचा चालक नवनाथ धाकपाडे याच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत हत्या आणि हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला कुणी आणि कोणत्या कारणातून केला याबाबत पोलीस तपास करत आहेत.