
भिंगार टोलनाक्यावरील दरोडय़ाच्या गुह्यात दोन दिवसांपूर्वी सिनेस्टाईल दरवाजा तोडून अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स स्वामी याच्यासह आठजणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाईचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
लॉरेन्स स्वामी याच्यासह प्रकाश भिंगारदिवे (रा. निंबोडी), संदीप शिंदे (रा. बुरुडगाव), बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव, विक्रम गायकवाड (दोघे रा. वाळुंज), अर्जुन डुबे, संदीप वाकचौरे (दोघे रा. दरेवाडी), बाळासाहेब भिंगारदिवे यांचा या प्रस्तावात समावेश आहे.
भिंगार येथील उद्योजक लॉरेन्स स्वामी याचा भिंगार येथील टोल नाका तोडफोड प्रकरणात समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी कारवाई करून आठ तासांच्या कारवाईनंतर स्वामी याला अटक केली होती. त्याला सध्या पोलीस कोठडी मिळालेली आहे. लॉरेन्स स्वामीसह अन्य काही आरोपींचा या गुह्यात समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या आरोपींविरुद्ध 10 ते 12 गुन्हे दाखल असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ‘मोक्का’नुसार कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
































































