
राज्यातील महापालिका निवडणुकीत सध्या जो काही प्रकार सुरू आहे यावर एक नजर टाका म्हणजे भाजप काय आहे, हे लक्षात येईल. आता भाजपचा डीएनए भाजपमध्ये राहिला नाही. दुसऱया पक्षांतील आयात उमेदवार घेतल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही असे भाजपला कळून चुकले आहे, अशी जहरी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.
राज्यात बिनविरोध निवडून आलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे कॅरेक्टर चेक करा. ते कोणत्या पक्षाचे आहेत तेही तपासून पाहा. जे निवडून आले आहेत, त्यांनी असे कोणते दिव्य काम केले आहे? डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीतील निवडणुकीला टाळून हे महाशय बिनविरोध निवडून आले आहेत. खरे म्हणजे त्यांचे चारित्र्य तपासून पाहण्याची गरज आहे, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. सर्वात घाबरलेली पार्टी म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.
लोकशाहीची ‘ऐशी की तैशी’
लक्ष्मण हाके यांनी या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होतात. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतात, पण दुसरीकडे उमेदवारी देताना बोडके, आंदेकर, नायर यांच्यासारख्या गुंडांच्या कुटुंबीयांना तिकीट देतात. हीच त्यांची रणनीती आहे. गुंड, मवाली, पैसेवाले, मनी-मसल पॉवर व बोगस दाखले असलेल्यांनाच तिकीट दिले जात आहे. यामुळे लोकशाहीची ‘ऐशी की तैशी’ झाली आहे, असेही ते या वेळी म्हणाले.






























































