शिकाऊ वाहन परवाना आणि वाहन रजिस्ट्रेशनची फेसलेस सुविधा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरटीओमध्ये न जाता घरबसल्या आधारकार्ड आधारित शिकाऊ वाहन चालक परवाना मिळविणे आणि डीलर पॉइंट वाहन रजिस्ट्रेशन अशा दोन ‘फेसलेस’ सुविधांची सुरुवात आरटीओद्वारे होत असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार आहे. याप्रसंगी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिकाऊ वाहन चालक परवाना काढण्यासाठी अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर आधारकार्ड क्रमांक असल्यास शिकाऊ वाहन चालक परवाना परीक्षा घरबसल्या ऑनलाइन देता येणार आहे. ऑनलाइन परीक्षेमध्ये किमान 60 टक्के मिळाल्यानंतर आणि डॉक्टरचे प्रमाणपत्रही ऑनलाइन मिळवता येणार आहे. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांची परिवहन संकेतस्थळावर नोंदणी असणार आहे.

वाहन वितरकांनासुद्धा ग्राहकांच्या नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहने यांची पहिली नोंदणी आता ऑनलाइनच करता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे मोटर वाहन निरीक्षकांच्या भेटीची किंवा आरटीओमध्ये वाहन घेऊन जाण्याची गरज नसेल. त्यामुळे आता नोंदणीसाठीचा वेळ वाचणार आहे. तसेच लांबच लांब रांगा लावण्याची, वाहनधारकांना फेऱया मारण्याची आवश्यकता भासणार नाही.

घरबसल्या लर्निंग लायसन्स!
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आरटीओकडून वेळ उपलब्ध करून दिली जाते. परीक्षेची तारीख कधी लवकर मिळते, तर कधी महिनाभर वाट बघावी लागते. मात्र, या नव्या सुविधेमुळे यात बदल होणार आहे. घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आल्याने बऱयाच गोष्टी सोप्या होणार आहेत. ज्यांच्याकडे ऑनलाइन परीक्षा देण्याची सोय नाही त्यांना आरटीओमध्ये येऊन परीक्षा देण्याची सुविधाही सुरू राहणार आहे.