
सामना प्रतिनिधी । उदगीर
वाढत्या वीज बिलांपासून सुटका करीत वीज बिलात बचत करून नगरपालिकेचा वीज बिलापोटी जाणारी रक्कम वाचविण्यासाठी संपूर्ण शहरातील खांबांवर एलईडी बल्ब बसविण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवार १२ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. आमदार सुधाकर भालेराव आणि नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते नगरपालिके समोरील खांबांवर एलईडी बसवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालविलेल्या उपक्रमांतर्गत उदगीर शहरातील सर्व खांबांवर एलईडी बसविण्यात येत आहेत. वीज बचत करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यासाठी नागरिकांनीही आपापल्या घरी सुद्धा एलईडी बसवून घ्यावी, असे आवाहन आवाहन भालेराव यांनी यावेळी केले. उदगीर शहरातील साडे चार हजार खांबांवर एलईडी बसाविण्यात येणार आहेत यामुळे विजेवर होणाऱ्या खर्चात खूप मोठी बचत होणार आहे. यामुळे भविष्यात वीज बिल भरले नाही म्हणून रस्त्यावरील लाईट बंद राहणार नाहीत याची व्यवस्थाच या एलईडीमुळे कायमस्वरूपी होत असल्याचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी नंदकुमार नलंदवार, मुख्याधिकारी भारत राठोड, पाणी पुरवठा सभापती मनोज पुदाले, बांधकाम सभापती रामचंद्र मुक्कावार, नियोजन सभापती रामेश्वर पवार, नगरसेवक मंजूर पठाण, अॅड. सावन पस्तापुरे, शमशोदिन जरगर, अनिल मुदाळे, पप्पू गायकवाड, अमोल अणकल्ले, झुंजार पाटील, विद्युत अभियंता सुरेश ढवळे, मल्लीकार्जुन हालकुडे, वैजनाथ बदनाळे यांच्यासह न. प. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





























































