लेह-लडाखची सफर मोटरबाईकवर!

स्वप्ना सामंत यांनी आयुष्यात नियतीचे असंख्य घाव सोसले. एकटीवरच कौटुंबिक जबाबदारी असली तरी त्या डगमगल्या नाहीत. आयुष्याला सामोरं जात स्वप्ना यांनी आपली भटकंतीची आवड कायम ठेवली. नुकतीच स्वप्ना यांनी मोटरबाईकवरून लेह, लडाखची सफर केली,  तीही एकटीने.

बॉलीवूडवाली तापसी पन्नूचा चित्रपट ‘धकधक’ चित्रपटातील त्या नायिकांप्रमाणेच लेह, लडाखचे, आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एक म्हणजे स्वप्ना सामंत! वयाच्या सत्तरीत मोटरबाईकवर लेह लडाख सर करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांचा हा प्रवास अनेकींना प्रेरणा देणारा आहे.

स्वप्ना सामंत दादरला एकटय़ाच राहतात. नवऱ्याने साथ सोडून बरीच वर्षे झाली. मुलगी प्राजक्ताची जबाबदारी आणि सोबत वयोवृद्ध आई. या काळात भटकंती कमी झाली मात्र काही वर्षांनी बऱ्यापैकी स्थैर्य आले आणि मग हिमाचल वगैरेचे दौरे सुरू झाले. स्पितीच्या एका प्रवासातच त्यांच्या मनाने हट्ट धरला की, आता लेह-लडाख सर करायचा… तोदेखील मोटरबाईकवर!

“मला बाईक चालवता येत नाही. या वयात मी शिकूही शकत नाही. आता काय करायचं? मला म्हातारीला हिमाचलात कोण घेऊन जाणार? असे प्रश्न सतावत असताना माझ्या मदतीला गुगलबाबा आले. तिथे माझा इंटरनॅशनल युथ क्लबशी परिचय झाला. झिशान, अश्विन, गिरीश, मंगेश यांच्याशी मैत्री झाली. ते मला बुलेटच्या मागच्या सीटवर बसवून लेह, लडाखला घेऊन जायला तयार झाले. आमचा तीसजणांचा ग्रुप तयार झाला. तिकडचे रस्ते, खाचखळगे, शून्य डिग्रीच्या  खालचं तापमान, तिकडचे पॉइंट्स, तिथे येणारी आव्हानं, हिमवर्षाव, वादळे यांचा अभ्यास आधीच झाला होता, पण खरी समस्या होती मित्रमंडळी आणि नातेवाईकांची. अनेकांनी आजारपणापासून ते अगदी ‘साठी बुद्धी नाठी’ पर्यंत अनेक प्रश्न व टोमणे मारले. पण मी न डगमगता माझा प्रवास सुरू ठेवला.

स्वप्ना यांना अनेक वर्षांपासून लेह, लडाखला जायचे वेध लागले होते. मधल्या काळात अनेक समस्या उभ्या ठाकल्या पण स्वप्ना यांनी हार मानली नाही. त्या सांगतात, “18 ऑगस्ट 2023 ला मी दिल्लीसाठी विमानात बसले…एकटीच. सकाळी मुंबई-दिल्ली आणि संध्याकाळी बसने मी मनाली गाठली. दिवेन सरवानी आणि मंगेश शेलार हे दोघे माझ्या मोटरबाईक भ्रमंतीमधले गुरू. त्यांच्यामागे बसून मी हिमालय पालथा घातला. या दोन तरुणांनी मला अगदी फुलासारखं जपलं. कधी मी मंगेशच्या बाईकवर बसायचे तर कधी दिवेनच्या बाईकवर. इतक्या दिवसांचा आमचा प्रवास, पण माझ्या मनात एक क्षणभरही कधी असुरक्षिततेची भावना आली नाही. उलट दिवसेंदिवस माझ्यातला आत्मविश्वास वाढत गेला. हिमवर्षाव किंवा डोंगरदऱ्यांची पडझड झाल्यावर, रस्ते बर्फामुळे बंद पडल्यावर, मोटरबाईकचं इंजिन थंड झाल्यावर असंख्य प्रश्नांची उत्तरे पटापट मिळाली. आयुष्य सोपं वाटू लागलं. आयुष्यात आव्हानं येणारच, समस्या सतावणारच. आता आपलं जीवन संपलं असाही विचार मनात गुंता निर्माण करणारच, पण ही  वादळे क्षणभंगुर असतात. थोडा काळ लोटल्यावर आपोआप प्रश्न सैल होतात. ‘कालाय तस्मै नम’ असं भगवद्गीतेत उगाच नाही म्हणून ठेवलं आहे. नम्रता, मुफी, गिरीशजी, हर्षा ही मला हिमालयात भेटलेली माणसं. एकापेक्षा एक जिवाभावाची. मी त्यांची कोणीच नव्हते, पण त्यांनी मला तळहातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळलं.

लेहच्या मार्गावर जिस्पा या गावाने माझ्या मनात घर केलं. तिथे आम्ही थांबलो. जसजशी आम्ही उंची गाठू लागलो तशी माझ्या मनात झिंग चढू लागली. एकतर मोटरबाईकच्या प्रवासामुळे डोक्यात  वेगळा आत्मविश्वास जन्मला. शिवाय इतकी वर्षे उरी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरतंय या विचाराने आनंद गगनात मावत नव्हता. माझ्यासारखी पासष्टी ओलांडलेली बाई लेह, लडाख सर करायला बाईकवर निघालीय ही बातमी गिर्यारोहकांच्या साऱ्या ग्रुप्समध्ये पसरायला वेळ लागला नाही. त्यामुळे लोकांचे ग्रुप्स माझ्याकडे कुतूहलाने पाहायचे. काही जण स्वतहून बोलायला यायचे, कौतुक करायचे. जिस्पा सोडल्यावर आमचा पुढचा थांबा होता…सर्चू! सर्चूला आमची बाईक थांबली तेव्हा थोडा थकवा जाणवू लागला, पण तो तेवढय़ापुरता. सर्चूला फक्त तुफान वाऱ्याचं साम्राज्य होतं. शेजारी उभ्या असलेल्या माणसाशी बोलायची सोय नव्हती. वारा ‘मी’ म्हणत होता. बर्फाच्छादित डोंगरही रखरखीत असू शकतात हे मला तिथे आयुष्यात पहिल्यांदा कळलं.

बाइकर्सचे ग्रुप जेव्हा लेह, लडाखसारख्या मोठय़ा ट्रिपवर निघतात तेव्हा प्रथमोपचाराची सोय सोबत असते. सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, चक्कर येणे, उलटीसारखं वाटणे, कधी नाकातोंडातून रक्त येणे हे प्रकार हमखास होतात. त्यात काही विशेष नाही. मी यादृष्टीने पूर्वतयारी केली होती, पण विशेष म्हणजे मला संपूर्ण ट्रिपमध्ये एकदासुद्धा त्रास झाला नाही. माझे सहकारी चकित झाले. ट्रिप संपता संपता नम्रता, मंगेश, हर्षा…सगळे म्हणाले, आमच्यापेक्षा तुम्ही सर्वात तरुण आहात. त्यांची प्रतिािढया ऐकून मी मनोमन सुखावले. मनात म्हणालेसुद्धा, चला, आता पुढच्या ट्रिपची तयारी करायला हरकत नाही.”

[email protected]