
स्वराज्यनिष्ठ सरदार कान्होजी जेधे देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भोर तालुक्यातील आंबवडे या गावात त्यांची समाधी उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत मोलाची भूमिका बजावणारे कान्होजी जेधे महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक गावनेत्यांचा पाठिंबा मिळवून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या घराण्यांनी सर्वस्व बहाल केले त्यापैकी एक म्हणजे कारीचे जेधे घराणे. शिवकाळात कान्होजी जेधे आणि त्यांचा पुत्र बाजी उर्फ सर्जेराव यांचे योगदान मोलाचे आहे. कान्होजी जेधे हे भोर जवळील कारी गावचे देशमुख. ते काही वर्षे शहाजी राजांसोबत दक्षिणेत होते. पुढे स्वराज्याच्या कामी शिवरायांना साहाय्य करण्यास आले तरी ते आदिलशाहच्या सेवेत होते. अफजलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा आदिलशाहने कान्होजी जेधे यांनी अफजलखानास मदत करण्याचे फर्मान काढले परंतु कान्होजींनी आदिलशाही वतनावर पाणी सोडत स्वराज्याशी निष्ठावान राहिले. त्यांच्या स्वराज्यसेवेची निष्ठा पाहून महाराजांनी त्यांना तलवारीच्या प्रथम पानाचा मान दिला. जेधे घराण्याचा वाडा आजही कारी गावात पाहायला मिळतो.



























































