
संत सोयराबाई ही भगवद्भक्त चोखा मेळय़ाची अर्धांगिनी, चोखोबांच्या आयुष्यात पदार्पण करून ती मंगळवेढय़ाला आली. चोखोबांचे सर्व घराणे भगवद्भक्तीत रंगून गेलेले होते. सासरी येताच तिच्या आयुष्याला भक्तिरसाचा प्राणस्पर्श झाला. बहिष्कृत, करुणामय, कष्टप्रद जीवनावर चोखोबांप्रमाणे मात करून ‘कोटीचंद्र प्रकाशात तळपणारा कैवल्याचा पुतळा’ विठ्ठल आपण पाहू शकतो या आत्मविश्वासाच्या संजीवनीने तिचे जीवन पुलकीत झाले. आत्मविश्वासाच्या लक्षवेधी अभंगवाणीत ती प्रकट होऊ लागली. तिने आपली नाममुद्रा ‘चोख्याची महारी’ अशी ठेवली आहे. कारण ती एका अभंगात हा भाव व्यक्त करते, ‘चोखा माझा जीव। चोखा माझा भाव। कुलधर्म देव। चोखा माझा।।’ तिच्या अभंगातून तिच्या प्रज्ञाशक्तीचा ठसा उमटतो. ‘चोखा सोयरा कर्ममेळा। भेटू आले त्या निर्मळा। झाली निर्मळेची भेटी। सोयरा पायी घाली मिठी।। धन्य बाई मेहुणपुरी। म्हणे चोख्याची महारी।।’ या अभंगात ‘निर्मळा’ आणि ‘मेहुणपुरी’ या शब्दांतून तिने अनेक अर्थछटा निर्माण केल्या आहे. पांडुरंगाला जेवायला बोलावताना ‘येई येई गरूडध्वजा। विटेसहित करीन पूजा।’ या अभंगात विचार सौंदर्य, भाषासौंदर्य, शांत, सोज्वळ मनाची डूब जाणवते. संस्कृतप्रचुर शब्दांची डौलदार श्रीमंती तसेच कुटुंबवत्सल स्वागतशील स्त्री मनाचे यातून दर्शन घडते.
ह प्रा. शरयू जाखडी



























































