
रोहनने मित्रांच्या मदतीने चारशे ते पाचशे लिंबाच्या साली गोळा केल्या. सुकवून त्याची भुकटी बनवली. त्यात पाणी आणि साबणाचे बारीक किसलेले तुकडे टाकून त्याची पेस्ट तयार केली. त्यानंतर त्यात मक्याचे आणि बेसन पीठ, हळद, मीठ, कापूर यांचे समप्रमाणात मिश्रण करून त्याचा पिठासारखा गोळा तयार केला. पीठ साच्यात घालून मोदकाचा आकार दिला. या मोदकरूपी साबणाचे वाटप करून अनोख्या पद्धतीने जनजागृती तो करणार आहे.
मोदक म्हणजे बाप्पाचे आवडते पक्वान्न. गणेशोत्सव जवळ आला की मिठाईच्या दुकानांत उकडीच्या मोदकांपासून ते चॉकलेट, ड्रायफ्रुटपर्यंत विविध व्हरायटीचे मोदक पाहायला मिळतात. आरतीनंतर घरोघरी मोदकाचा प्रसाद वाटला जातो. मात्र रोहन सावंत या तरुणाने तयार केलेल्या मोदकाची बात काही औरच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याने चक्क लिंबाच्या सालीपासून मोदक तयार केले आहेत. या मोदकाचा वापर प्रसाद म्हणून खाण्यासाठी नव्हे तर घरी येणाऱया भक्तांचे हात निर्जंतुक करण्यासाठी केला जाणार आहे. अशाप्रकारे सुरक्षारूपी प्रसादाचा आनंद भक्तांना घेता येणार आहे.
चिंचपोकळी येथे राहणारा रोहन सावंत हा पेशाने कलादिग्दर्शक आहे. मित्रांच्या मदतीने त्याने टाकाऊ लिंबाच्या सालीपासून मोदक सोप तयार केले आहेत. याबाबत रोहन सांगतो, कोरोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही. गणेशोत्सवात नातेवाईक, मित्रमंडळी एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून आम्ही मोदकाच्या आकाराचे साबण तयार केले आहेत. जेणेकरून कोरोनाला अटकाव घालता येईल. पुढे तो म्हणाला, कोरोनाकाळात लिंबूपाणी सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. लिंबाप्रमाणे लिंबाची साल अत्यंत गुणकारी असते. मात्र अनेकजण लिंबाची साल फेकून देतात. यानिमित्ताने लोकांना लिंबाच्या सालीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.




























































