
सामना प्रतिनिधी । मुक्रमाबाद
लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील मुक्रमाबाद येथील संपादित घरांचा तात्काळ मावेजा द्या, अन्यथा रास्तारोको मागे घेणार नसल्याचा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. रखरखत्या उन्हामध्ये धरणग्रस्तांनी सहा तास रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे महाराष्ट्र व तेलगंणा या दोन राज्याच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित असलेल्या आणि 34 वर्षापासून सुरू असलेल्या लेंडी धरण प्रकल्पाचा विषय गुंतागुंतीचा होत आहे. धरण पूर्ण होत आले असतानाही शासनाच्या निष्क्रितेमुळे गेल्या सात वर्षापासून धरणाचे काम बंद आहे. लेंडी धरणाच्या बुडीतक्षेत्रात 12 गावातील जमिनी व घरे बाधीत झाली असून यापैकी 11 गावातील जमिनी व घरांचा अन्यायकारक मावेजा देऊन प्रकल्पग्रस्तांची बोळवण करण्यात आली. मात्र, धरणाच्या बुडीत क्षेत्रातील मुक्रमाबाद येथील संपादित 1310 घरांचा मावेजा आजतागायत मिळाला नाही.
मुक्रमाबाद येथील घरांचा मावेजा मिळण्याबाबत प्रकल्पग्रस्तांनी रस्त्यावर उतरुत अनेक तीव्र आंदोलने केली. मात्र, फक्त आश्वासने देऊन प्रकल्पग्रस्तांची थट्टा करण्यात आली. धरणात घरे संपादित झाल्यामुळे त्याची दुरुस्तीही करता येईना, नवीन घर बांधावे म्हटले तर पैसा व जागा नाही. यामुळे घरांची पडझड झाल्यामुळे त्याठिकाणी सापांचा वावर वाढला आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त व त्यांचे कुंटूब जीव धोक्यात घालून पडक्या घरात राहत आहेत. गेल्या 34 वर्षांपासून लेंडी धरणाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवण्यात आल्या. याकाळात हेच राजकीय पुढारी लेंडी धरणाचा विषय मोठ्या चवीने चघळतात, अनेक आश्वासन देतात, एकदा निवडून आले पुन्हा पाच वर्षे फिरकून पाहत नाहीत. यामुळेच प्रकल्पग्रस्तांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भुमीसंपादन व पुनर्वसन विभाग नांदेड यांच्याकडून 5 मार्च रोजी अधिनियम 2013 च्या कलम 24 (1) ( अ) आधारे प्रकल्पग्रस्तांना नोटीस देऊन लवकर तुमच्या खात्यावर मावेजाची रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले. नोटीस दिल्यानतंर काही दिवसांच्या आत घरांचा मावेजा देणे बंधनकारक असतानाही 90 दिवस झाले तरी घरांचा मावेजा न मिळाल्याने मावेजा मिळण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी मुख्य बसस्थानकावर भर उन्हात सहातास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार आर.आर. पदमावार, सहायक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी आठ दिवसात तुमच्या मावेजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले. तरी प्रकल्पग्रस्तांनी रास्तारोको सुरुच ठेवला. व्यापाऱ्यांनी दुकाने दिवसभर बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे बालाजी पसरगे, बलभीम देवकत्ते, माणिक गायकवाड, बालाजी बोधने यांची भाषणे झाली. यावेळी बाळु मेटकर, अशोक कांबळे, राहूल इंदुरेसह महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. बीट जमादार शिवाजी आडेकर, सुधाकर कामठेवाड, माधव जळकोटे, मिंलीद नरबागसह आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.



























































