
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील गंगाधर वाळीबा ठाकरे (70) बुधवारी रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास कुत्र्यावर होणारा बिबट्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी गेले असता बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घामोरी शिवारात गंगाधर ठाकरे हे आपल्या वस्तीवर कुटुंबासह राहतात. रात्री 2:40च्या दरम्यान बिबट्याने ठाकरे यांच्या वस्तीवरील कुत्र्यावर हल्ला केला. ठाकरे यांनी कुत्र्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु बिबट्याने कुत्र्याला सोडून ठाकरे यांच्यावर चाल करत हल्ला चढविला.
त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुमारे 52 टाके पडले आहेत त्यांच्यावर चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत. दरम्यान वन विभागाच्या अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली विचारपूस करून घटनेची माहिती जाणून घेतली.





























































