मंचरमध्ये बिबट्याचे पुन्हा दुचाकीस्वारांवर हल्ले; चारजण जखमी

मंचरजवळील लांडेवाडी येथे सोमवारी रात्री बिबट्याने दुचाकीवर केलेल्या हल्ल्यात चारजण जखमी झाले. या हल्ल्यातील जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनपरीक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी दिली. ठाकरवाडीकडे जाणाऱ्या संतोष पवार या दुचाकीचालकाबरोबर ललिता आदिती पवार (वय २५), साक्षी आदिती पवार (वय २), राधाबाई मधुकर वाघे (वय ४८) हे घरी निघाले होते.

ठाकरवाडी रस्त्यावर त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. दुचाकीस्वाराने वाहन जोरात चालविल्याने तो बचावला. मात्र मागे असलेले तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना ताजी असतानाच, आशुतोष बाळशीराम शेवाळे, (वय २६) हा युवक दहा मिनिटांनी याच ठिकाणवरून जात असताना, त्याच्यावरदेखील बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ प्राथमिक उपचार करून चारही जखमींना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आणि ढेरंगे यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. ही माहिती कळताच, वनपाल एम. टी. मिरगेवाड, वनरक्षक एस. के. ढोले व बिबट कृती दलाची टीम घटनास्थळी दाखल होऊन घटनेची चौकशी करून वनपरीक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली.