चंद्रपूरातील सिदेवाही वनपरिक्षेत्रात आढळला बिबट्याचा मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरातील सिदेवाही वनपरिक्षेत्रात तीन वर्षाच्या नर बिबट्याचा झुंजीत मृत्यू झाल्याची गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत डोंगरगाव बिटात कंपार्टमेंट नंबर 1361 मध्ये अंदाजे तीन वर्षे वयाचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. गुरुवारी सकाळी डोंगरगाव बीटचे वनरक्षक चहांदे हे जंगलात गस्त घालत असताना त्यांना नर बिबट्या मृतावस्थेत आढळला.

मृत बिबट्याच्या शरीरावरील जखमा आढळून आल्या असून शरीरावरील जखमांची परिस्थिती बघता दुसऱ्या बिबट्याशी किंवा वाघाशी झुंज होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदनही करण्यात येणार आहे. पंचनाम्याच्या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी शविशाल सालकर, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर, सहाय्यक वनसंरक्षक ब्रह्मपुरी वाकडे आदी उपस्थित होते.