
घराच्या पोर्चमधून चार वर्षांच्या चिमुकल्याला आपल्या जबडय़ात पकडत ओढून नेणाऱया बिबटय़ाच्या तावडीतून आईने चिमुकल्याची सुटका केली. समोर साक्षात बिबटय़ा असताना मातेने चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणल्याची घटना संगमनेरलगतच्या गुंजाळवाडीतील देशमुखनगरमध्ये शनिवारी सायंकाळी घडली आहे. जखमी चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ांचा वावर वाढला आहे. लोकवस्तीत आलेले हे बिबटे आता माणसांवरदेखील हल्ले करत आहेत. त्यामुळे माणसांवर हल्ले करणारे बिबटे पकडण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे. गुंजाळवाडीतील देशमुख नगरमध्ये सिमेंट पोल फॅक्टरीजवळ असलेल्या कृष्णाई बिल्डिंगच्या पाठीमागील भागात मोठय़ा प्रमाणात बाभळीची झाडे वाढली आहेत. त्यामुळे बिबटय़ांना दडून बसण्यास येथे छोटेसे जंगल निर्माण झाले आहे. या लगतच मोठय़ा प्रमाणात रहिवासी वस्ती आहे. येथे राहणाऱया संभाजी पवार यांच्या घराजवळील पोर्चमध्ये खेळणाऱया चार वर्षे वयाच्या शिवमवर बिबटय़ाने अचानक हल्ला केला. त्याची मान आपल्या जबडय़ात पकडून बिबटय़ाने त्याला समोरच्या मोकळ्या मैदानात आणले. यावेळी तेथे जवळच बसलेल्या शिवमच्या आजी आणि चुलतीच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी केलेल्या आरडाओरडीमुळे चिमुकल्याची आई बिबटय़ाच्या पाठीमागे धावू लागली.
तिने जीवावर उदार होत बिबटय़ाच्या तावडीतून आपल्या मुलाला सोडविले. बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात या चिमुकल्याच्या हनुवटीजवळ, पंजामुळे छातीला मोठय़ा प्रमाणात जखमा झाल्या आहेत. चिमुकल्याला तातडीने खासगी रुग्णालयात व तेथून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी शुभमच्या हनुवटीला सात ते आठ टाके पडले आहेत.
दरम्यान, घटनास्थळी वनक्षेत्रपाल सागर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झालेल्या वन विभागाच्या पथकाने शोध घेतला असता त्यांना झुडुपात लपलेला बिबटय़ा दिसला. मात्र, संतप्त झालेल्या परिसरातील ग्रामस्थांनी झुडपामध्ये जेसीबी घातल्याने बिबटय़ाने तेथून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत वन विभागाच्या पथकाने बिबटय़ाच्या शोधार्थ परिसर पिंजून काढला. मात्र, बिबटय़ा पसार झाला होता. बिबटय़ाने केलेल्या या हल्ल्यामुळे गुंजाळवाडी परिसरात भीतीचे वातावरण आहे.



























































