उपासमारीने अशक्त झालेल्या आणखी एका बिबट्याचा संगमेश्‍वरजवळ तडफडून मृत्यू

सामना प्रतिनिधी । संगमेश्‍वर

उपासमारीने अशक्त झालेल्या आणखी एका बिबट्याने आज आपले प्राण सोडले. हा मृत बिबट्या संगमेश्‍वरजवळच्या भिरकोंड गुरववाडी येथे आज दुपारी मृतावस्थेत सापडला. एका महिन्यात मृत बिबट्या सापडण्याची संगमेश्‍वर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.

आज दुपारी 3 च्या सुमारास भिरकोंड गुरववाडीतील गणपत तुकाराम गुरव यांच्या घराजवळ एक बिबट्या झोपलेल्या अवस्थेत काही ग्रामस्थांना दिसला. बिबट्या निपचीत पडल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी ही खबर पोलिस पाटील सुभाष महादेव गुरव यांना दिली. त्यांनी तत्काळ वनविभाग देवरूखला ही माहिती दिली. सदरचा बिबट्या मृतावस्थेत असल्याचे समजताच बघ्यांनी एकच गर्दी केली.

दरम्यान, चिपळूणचे विभागीय वनाधिकारी विजयराज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ लगड यांच्यासह देवरूखचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक गावडे, कदम आदी कर्मचारी घटनास्थळी पोचले. बिबट्या मृत असल्याची खात्री झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याचे शवविच्छेदन केले. यात बिबट्याच्या पोटात अन्नाचा एकही कण नसल्याचे दिसून आले यामुळे अनेक दिवस भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याने प्राण सोडल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. हा बिबट्या मादी जातीचा होता. तो 1 वर्षाच्या आतमधील असल्याचे सांगण्यात आले. रितसर कार्यवाही करून ग्रामस्थ व वनाधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या महिनाभरात बिबट्या मृतावस्थेत सापडण्याचा संगमेश्‍वर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.एक महिन्यापुर्वी मौजे असुर्डे येथे भक्षाचा पाठलाग करताना विजेच्या खांबावर चढलेल्या बिबट्याला विजेचा धक्का लागून तो जागीच मृत्युमुखी पडला होता. त्यानंतर पंधरा दिवसातच तुरळ येथे पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू ओढवला. यानंतर ही महिनाभरातील तिसरी घटना आज उघडकीस आली.

तालुक्यात सुरू असलेली बेसुमार जंगलतोड, वारंवार लागणारे वणवे यामुळे उजाड होणारे डोंगर आणि त्यातील संपत चाललेले रानटी प्राणी यामुळे बिबट्यांच्या भक्ष्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याच कारणामुळे तालुक्यात बिबटे खुलेआम मानवी वस्तीत घुसत आहेत. यातील बरेचसे बिबटे नाईलाज म्हणून पाळीव प्राण्यांवर हल्ले करताना दिसत आहेत.