
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावात फासकीत बिबट्या अडकला होता. वनविभागाने फासकी तोडून बिबट्याची सुटका केली. नेवरे येथे बिबट्या फासकीत अडकला होता. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फोन करून परिक्षेत्र वन अधिकाऱी प्रियांका लगड यांना माहिती दिली.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी आणि त्यांचे पथक तात्काळ नेवरे येथे पोहचले. पथकाला बिबट्या फासकीत अडकलेला दिसून आला. कटरच्या सहाय्याने फासकी तोडून बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. बिबट्याला पिंजऱ्यात ठेवण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी करण्यात आली.
त्यानंतर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले . हे रेस्क्यू ऑपरेशन परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रियांका लगड, वनपाल पाली गौ. पि. कांबळे, वनरक्षक जाकदेवी म.ग. पाटील, वनरक्षक रत्नागिरी मि. म. कुबल, वनरक्षक कोर्ले सा. रं. पताडे यांनी केले.
कोकणात बिबट्या फासकीत अडकणे, विहिरीत पडणे असे प्रकार घडत असतात. अशावेळी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील वनविभागाला संपर्क करतात. यावेळी मात्र चक्क मंत्र्यांचा फोन आला होता.



























































