
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख जवळच्या हरपुडे गावातील माजी पोलीस पाटील दत्ताराम दाजी कांबळे यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत भक्ष्याचा पाठलाग करताना शनिवारी रात्री बिबट्या पडला होता. विहिरीतून मोठमोठ्याने डरकाळ्यांचा आवाज येत असल्याने कांबळे यांनी रात्री १० : ३० वाजण्याच्या सुमारास विहिरीत पाहिले असता , त्यांना बिबट्या दिसला. दत्ताराम कांबळे यांनी तातडीने याबाबत देवरुख वन विभागाला कळवले.
वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने हरपुडे गावात आवश्यक साहित्यासह दाखल झाले. अथक परिश्रमानंतर देवरुख वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. या बिबट्याची रवानगी चांदोली येथील जंगलात करण्यात आली आहे.




























































