कराडमध्ये शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे- बंगळूर महामार्गावरील खोडशी (ता. कराड) येथे मंगळवारी पहाटे बिबट्या सापडला आहे. शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला होता. बिबट्या नर असून साधारण 1 वर्षे वयाचा आहे. बिबट्या फासकीत अडकल्याने खोडशीसह परिसरातील गोटे, वनवासमाची गावात भीतीचे वातावरण आहे.

कराडजवळ खोडशी येथे कृष्णा नदीकडेला सावकार वस्तीजवळ शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे. पहाटे बाळासाहेब पाटील यांच्या गुऱ्हाळ घरावरील काही लोक मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. तेव्हा कोणत्यातरी प्राण्याचा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी पाहणी केली असता बिबट्या फासकीत अडकल्याचे दिसून आले. यानंतर आता खोडशी भागात बिबट्याचा वावर असल्याचे यावरून स्पष्ट दिसते. मंगळवारी सकाळी कृष्णा नदीकडेला म्हसोबा मंदिरावजवळ बिबट्या फासकीत अडकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवले.

सकाळी वनविभाग पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाला असून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. पहाटे दाट धुके पसरले होते. सावकर वस्ती येथे शेतकऱ्याला बिबट्या फासकीत अडकल्याचे दिसल्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल तुषार नवले व वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. घटनास्थळी लगेच वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन्यजीव रक्षक रोहन भाटे व वनविभाग सर्व कर्मचारी वनपाल बाबुराव कदम, सावखंडे ,वनरक्षक रमेश जाधवर घटनास्थळी पोहचले. फासकीत अडकलेल्या बिबट्याला जाळी टाकून पकडत पिंजऱ्यात ठेवण्यात आले.

वनविभागाचे पशुवैद्यकीय डॉ. चंदन सवणे यांनी बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देत त्याच्या पायावर उपचार सुरू केले आहेत. पायाचा पंजा तुटला असून जखम खोल आहे. बहेली शिकारी बहुदा या भागात आहेत. शिकारीसाठी लावलेल्या फासकीला बहेली ट्रॅप असे म्हणतात.परिसरातील सर्व जनतेला सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात काही संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा शिकारी दिसल्यास वन विभागात माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेश येथील बहेली जमात ही संपूर्ण हिंदुस्थानात वाघ शिकारीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच ते जो सापळा वापरतात तोच वापरण्यात आला आहे.