कुष्ठरोगाचे उच्चाटन- स्वप्न आणि वास्तव

531

>> कौस्तुभ विकास आमटे

जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार ‘जागतिक कुष्ठरोग दिन’ म्हणून गणला जातो तो दिवस म्हणजे यंदाचा 26 जानेवारी. ‘गणला जातो’ म्हणण्याऐवजी ‘साजरा केला जातो’ हे म्हणण्याचे धैर्य माझ्यात नाही, कारण उत्तरांपेक्षा कुष्ठरोगविषयक प्रश्नांची मांदियाळी आजही मोठी आहे.

ष्ठरोगी वा महारोगी म्हणजे कुटुंबाने, समाजाने आणि प्रसंगी कायद्यानेही दिलेले मानहानीचे, तिरस्काराचे, बहिष्काराचे डंख सहन करत जगणारी(?) माणसं. शरीरास झालेला महारोग आधुनिक औषधोपचारांनी पूर्ण बरा होऊ शकतो, पण मनावर झालेले घाव पूर्णपणे भरून येण्यासाठी, जगाच्या दृष्टीने निरुपयोगी, मोडक्यातोडक्या झालेल्या या बांधवांचा पुरुषार्थ जागृत करण्याचा एक अनोखा प्रयोग बाबा आणि साधनाताई आमटेंनी 1949 मध्ये मध्य हिंदुस्थानात सुरू केला, त्याचे नाव ‘आनंदवन’. ‘करुणा ही पांगळेपण सुरक्षित ठेवणारी न राहता करुणेने पीडितांना स्वाभिमानी मन आणि नवे पंख दिले पाहिजेत’ हा त्यांचा निग्रह. याचाच परिपाक म्हणजे समाजाने नाकारलेल्या या माणसांनी आपल्या अपुऱया शारीरिक क्षमता ताणत, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आनंदवनाचा ताणाबाणा समर्थपणे विणून निर्माण केलेली स्वतःची एक आगळीवेगळी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था.

यशाचे मोजमाप करण्याची आनंदवनाची परिमाणंच वेगळी आहेत. शेतीतून किती कोटींचं वार्षिक उत्पन्न मिळालं यापेक्षा किती टन अन्नधान्य पिकलं, किती टन मासळी विकली गेली, वर्षाकाठी किती लक्ष लिटर्स दूध निर्माण झालं अशी ‘बलस्थाने’ दाखवणारी ही परिमाणे. महाराष्ट्रात दिव्यांगांच्या क्षेत्रात आनंदवन-निर्मित ट्रायसिकलने इतिहास रचला असं आम्ही म्हणतो याचे कारण घृणेचे सर्वोच्च प्रतीक म्हणून त्याज्य असलेल्या याच कुष्ठरुग्ण बांधवांनी मेटल फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये गेल्या 4 दशकांत 40,000 पेक्षा अधिक ट्रायसिकल्स निर्माण करत आनंदवनाला अख्ख्या महाराष्ट्रात ‘दिव्यांगानुकूल ट्रायसिकल्स’ तयार करणारे एकमेव केंद्र म्हणून अढळपद प्राप्त करून दिले आहे. “मीच इथे ओसाडावरती, नांगर धरुनी दुबळ्या हाती, कणकण ही जागवली माती, दुर्भिक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव…’’ हा राग आळवत हे बांधव हिंदुस्थानच्या ‘सकल राष्ट्रीय उत्पन्ना’त वर्षानुवर्षे भर घालत आहेत. आनंदवनाचे वेगळेपण म्हणजे हे यश हातापायांची झडलेली बोटे, शरीरावर जखमा, मनावर मानहानीचे व्रण घेऊन जगणाऱया माणसांच्या सामूहिक प्रयत्नांचे आहे!

उदाहरणादाखल मी आमच्या श्री. रमेश अमृ या ज्येष्ठ कार्यकर्त्याबद्दल थोडक्यात सांगतो. कुष्ठरोगामुळे हाताची सगळी बोटे वाकडी झालेले रमेश 80 च्या दशकाच्या सुरुवातीला आनंदवनात उपचारार्थ दाखल झाले. कुष्ठमुक्त झाल्यानंतर ते बगिच्यात राखणदारीचे काम करत असत. त्या दिवसांत ‘आनंदवन लेप्रसी हॉस्पिटल’चा भार एकहाती सांभाळत माझे वडील डॉ. विकास आमटेंनी कॅलिग्राफी, वूड शेव्हिंग करून, फुलांच्या पाकळ्या, गवत वापरून शुभेच्छा कार्डे करणे असे छंदही जपले होते. आनंदवनाला मदत करणाऱया मंडळींना धन्यवाद पत्रांसमवेत त्यांनी ही कार्डे पाठवली असता ही मंडळी एवढी खूश झाली की आम्हाला दिवाळीसाठी, नववर्षासाठी आनंदवनात तयार झालेली कार्डेच विकत हवीत अशी मागणी पुढे आली. आता काय करावे? या विचाराधीन असतानाच डॉ. विकासना रमेश म्हणजे ‘पैलू न पाडलेला हिरा आहेत’ असा साक्षात्कार कसा काय झाला काय माहीत! त्यांनी शुभेच्छा कार्डांची जबाबदारी थेट रमेश यांच्या खांद्यावर टाकली. हो-नाही म्हणत रमेश यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पाहतापाहता केळीच्या साली, धानाचं तणीस, रंगीत कागदांचे तुकडे, एक्स-रे फिल्म्स, चिंध्या, रद्दीतल्या मासिकांची रंगीत कव्हर्स वापरत निरनिराळ्या डिझाईन्सची सुंदर कार्डे तयार होऊ लागली. पुढे पुढे तर रमेश यांनी सुईमध्ये दोरा ओवत धाग्यांची रंगीबेरंगी शुभेच्छा कार्डे बनवणेही सुरू केले. हळूहळू रमेशना सहप्रवासी मिळाले. आज हे हस्तकला डिपार्टमेंट चाळीसेक खांबांचे आहे. कुणाची बोटं वाकडी तर कुणाला एकही नाही, कुणाला पाय नाहीत, कुणाला कमी दिसतं तर कुणी कर्णबधीर; रमेश यांच्यासारखेच हे सर्व खांब! स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करत यांनी निर्मिलेली शुभेच्छा कार्डे बघून लोक चाटच पडतात. थोडीथोडकी नव्हे, चांगली लाखभर हँडमेड शुभेच्छा कार्डे दरवर्षी आनंदवनातून विकली जातात! रमेश आणि त्यांच्या सहकाऱयांची शुभेच्छा कार्डे ‘आनंदवनाचे राजदूत’ म्हणून देश-विदेशात पोहोचली ज्यातनं अनगिनत देणगीदार, मित्रमंडळी आनंदवनाशी कायमची जोडली गेली.

आनंदवनाच्या प्रयोगाची गोष्ट म्हणजे रमेश यांच्यासारख्याच पैलू न पाडलेल्या हजारो हिऱयांची गोष्ट. आनंदवनाचा एक कार्यकर्ता या नात्याने ही गोष्ट सांगतांना माझेही ऊर अभिमानाने दाटून येणारच. पण याची एक दुसरी बाजू पण आहे. गेल्या 7 दशकांच्या प्रवासात रमेश यांच्यासारखी थोडीथोडकी नव्हे, तब्बल ‘11 लाख कुष्ठग्रस्त माणसं’ आनंदवनाच्या संपर्कात आली. पण हा आकडा नेमकं काय दर्शवतो? सामाजिक बहिष्काराचे आणि कौटुंबिक उपेक्षेचे गहिरे घाव दिले गेले नसते तर ही माणसं वस्तुतः आनंदवनाच्या संपर्कात आलीच का असती? याउप्पर, ‘कुष्ठरोग-ग्रस्त ते कुष्ठरोगमुक्त’ हा प्रवास केलेल्या बांधवांना निरोगी(?) समाज आज तरी स्वीकारतो का?

कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन व्हावे, हा मुद्दा वेळेत रोगनिदान आणि उपचाराशी निगडित आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार प्रत्येक देशात हे कार्य सुरू आहे. प्रश्न अनुत्तरित आहे तो कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या बांधवांच्या समाजस्तरावरील न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण पुनर्वसनाचा. हिंदुस्थानच्या परिप्रेक्षात बोलायचे झाले तर आजही हिंदुस्थानातल्या लाखो कुष्ठमुक्त बांधवांना एक तर आनंदवनासारख्या स्वयंसेवी संस्थांमध्ये नाहीतर गाव-शहर कुसाबाहेरील लेप्रसी कॉलनीजमध्ये वास करावा लागतो. “अजिंठा, वेरुळ, खजुराहोच्या भग्न शिल्पांची फुटलेली नाके आणि तुटलेले हात सौंदर्यास्वाद घेत भरभरून पाहणाऱया ज्या चक्षूंना कुष्ठरोगाच्या जीवाणुमुळे भग्न झालेल्या जिवंत मानवी देहातले मूळचे शिल्प मात्र दिसत नाही त्यांना ‘निरोगी’ म्हणावे तरी कसे?’’ हा बाबा आमटेंना 1949 साली पडलेला प्रश्न दुर्दैवाने आजही साधार आहे. ‘निरोगी शरीर’ आणि आणि ‘रोगी मन’ असलेल्या समाजाने ‘रोगी शरीर’ आणि निर्मितीत गुंतलेल्या हातांमुळे ‘रोगमुक्त मन’ झालेल्या माणसांकडून काही शिकावे, ही बाबा आमटेंची हाक होती. त्यांना अभिप्रेत असलेला ‘मनाचा महारोगविरहित’ समाज निर्माण होण्यासाठी आनंदवन कायम कटिबद्ध राहील.

ज्या समाजात आनंदवनासारख्या ‘सामाजिक तुरुंगा’ची वेगळी गरजच उरणार नाही अशा ‘सर्वसमावेशी’, ‘सहृदय’ समाजाचे स्वप्न आनंदवनाचे सचिव डॉ. विकास आमटे पाहतात. परंतु या स्वप्नाची फलश्रुती कैक योजने दूर आहे. त्यामुळे, जागतिक कुष्ठरोग दिन ‘साजरा’ करावा का? किंवा का करावा? या प्रश्नांचे उत्तर अद्याप दृष्टिपथात नाही. आणि हेच आजचे जळजळीत वास्तव आहे.

ना दखल, ना दाखला
काही वर्षांपूर्वीचीच घटना… आनंदवनात झाडाखाली बसून ढसाढसा रडणाऱया वयाच्या पन्नाशीतल्या कुष्ठमुक्त बाईच्या हातात एक पोस्टकार्ड असतं. त्यातला मजकूर असतो, “आई, आनंदाची बातमी आहे. छोटय़ा ताईचं लग्न ठरलं आहे. पण तुझ्या नावाची आता कुटुंबाच्या ‘रेकॉर्ड’वर नोंद नाही. त्यामुळे तू पत्र पाठवू नको, फोन करू नको किंवा गावाकडे लग्नाला येण्याचा प्रयत्न करू नको. जमलं तर पुढे कधीतरी आम्हीच आनंदवनात येऊन तुला भेटून जाऊ.’’ हा ‘पुढे कधीतरी’ बहुतेक वेळा कधीच उगवत नाही. अस्तित्वच नाकारलेल्या या बांधवांची जिवंतपणी काय किंवा निधनानंतर काय, ना कुणी ‘दखल’ घेतं ना कुठला ‘दाखला’ असतो. ‘कुष्ठरुग्णांचं आयुष्य मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असतं’ असं म्हणतात याचे मार्मिक उत्तर आपल्याला अशा प्रसंगांतून मिळते.

(लेखक ‘आनंदवन व समाजभान अभियान’ आणि ‘आनंदवन भूजलशाश्वत सहयोग’ या उपक्रमांचे संचालक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या