
राजस्थानातील जोधपूरमध्ये एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या नवऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करत इलेक्ट्रीक ग्राईंडर (करवतीने) त्याच्या शरिराचे तुकडे-तुकडे करत फेकून दिले. ही व्यक्ती तिथल्या कृषी विभागात कामाला होती अशी माहिती मिळाली आहे. बनार पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली असून यामध्ये मृतकाच्या पत्नीचाही समावेश आहे. या चौघाना न्यायालयासमोर हजर करून पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केली. आरोपींने वापरलेले वाहन अजून सापडले नसून त्याचा शोध घेण्यासाठी आरोपींची कोठडी गरजेची असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यांची विनंती मान्य करत न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
काय घडलं ?
कृषी विभागात सहाय्यक अधिकारी असलेल्या चरणसिंह यांचे लग्न सीमाशी झाले होते. लग्न झाल्यानंतर सीमा माहेरी आली होती. चरण सिंह आणि सीमा यांचा गौना नावाची प्रथा पूर्ण होणं बाकी होतं. या प्रथेमध्ये माहेरी गेलेल्या बायकोला नवरा त्याच्या घरी घेऊन येत असतो. चरणसिंहने अनेकदा सांगूनही सीमा त्याच्या घरी यायला तयार नव्हती. या प्रथेला बराच विलंब होत असल्याने चरणसिंह अस्वस्थ झाला होता आणि तो सीमावर सातत्याने दबाव टाकत होता. सीमा ही लेस्बिअन म्हणजेच समलिंगी आहे, ज्यामुळे ती नवऱ्याकडे परत जाण्यास तयार नव्हती. लोकं काय म्हणतील या भीतीने तिने तिचे समलिंगी संबंध जगापासून लपवून ठेवलेले होते. सासरी जायच्या विचाराने पोटात गोळा आलेल्या सीमाने एक भयंकर कट रचला होता. या कटामध्ये तिने तिची नातेवाईक असलेल्या बबिता, प्रियंका आणि भीयाराम जाट यांनाही सामील करून घेतलं होतं.
सीमाने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने चरणसिंह याची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिने त्याचा मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि इलेक्ट्रीक ग्राईंडरने त्याच्या शरिराचे बरेच तुकडे केले. हे तुकडे तिने नातेवाईकांच्या मदतीने शहराजवळच्या नाल्यात आणि महापालिकेच्या प्रक्रिया केंद्रात फेकून दिले होते. तुकड्या तुकड्यात विखुरलेला मृतदेह सापडल्यानंतर जोधपूरमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी चरणसिंह याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेला ग्राईंडर जप्त केला आहे. सीमा हिने कोणाच्या दबावाखाली येऊन ही हत्या केली होती का ? तिचे संबंध कोणत्या महिलेशी होते? या महिलेचा हत्येमध्ये काही समावेश होता का ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पोलीस आता प्रयत्न करत आहेत.
























































