
माणसाच्या मृत्यूनंतर नेमके काय होते, या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. अनेक धर्मग्रंथांमधले संदर्भ आणि संशोधकांमध्ये या मुद्द्यावर अनेक मतभेद आहेत. मृत्यूनंतरही जीवन असते आणि माणसाने केलेल्या कर्माच्या आधारे त्याची पुढची गती निश्चित होत असते, असे धर्मग्रंथांचे मत आहे. तर मृत्यूनंतर शरीरातील हृदय आणि मेंदूचे कार्य थांबल्यावर सर्व गोष्टी संपतात. मृत्यूनंतरचे जीवन आणि पुढची गती याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे संशोधकांचे मत आहे. मात्र, मृत्यूनंतरच्या जीवनाचा आपण अनुभव घेतल्याचा दावा नुकताच काहीजणांनी केल्याने याबाबतच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
मृत्यूनंतर खरोखरच जीवन असते काय, मृत्यूनंतर जीवन असेल तर ते जग कसे असते असे प्रश्न प्रत्येकाला पडतात. मृत्यूनंतरच्या जीवनाचा अनुभव घेण्याबाबत आणि ते समजून घेण्यासाठी अनेक प्रकराचे संशोधन करण्यात आले आहे. मेंदूपर्यंत होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवून त्या जगात प्रवेश करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. त्यात जे अनुभव आले त्यांनी नियर डेथ एक्सपिरिअन्स म्हणजेच मृत्यूचा जवळून घेतलेला अनुभव असा अर्थ होतो. पीटर नावाच्या एका व्यक्तीने त्याचे नियर डेथ एक्सपिरिअन्सचे अनुभव शेअर केले आहेत. मृत्यूनंतर जीवन असते आणि तेथील जग आपण जवळून पाहिल्याचा दावा पीटरने केला आहे. निअर डेथ एक्सपिरिअन्स रिसर्च फाउंडेशनच्या वेबसाइटवर पीटरचे अनुभव अपलोड करण्यात आले आहे. 16 मार्च 2010 मध्ये आपण हा अनुभव घेतल्याचे पीटरने म्हटले आहे.
आपण बाथटबमध्ये आंघोळ करत असताना आपण पाण्यात बुडू लागलो. त्यानंतरच्या काही क्षणात आपल्याला जे अनुभव आले ते आपण कधीही विसरू शकत नसल्याचे पीटरने म्हटले आहे. पाण्यात बुडल्यावर आपल्या शरीरातून आपण वेगळे झाल्याचा अनुभव आपण घेतला. शरीरापासून वेगळे झाल्यावर डोळ्यासमोर अंधार पसरला. त्यानंतर आयुष्यात कधीही न पाहिलेला प्रकाशाचा झोत अंगावर आला. त्या प्रकाशातून काळे कपडे घातलेली महिला आपल्याजवळ येत असल्याचे पीटरने सांगितले. आता माझ्या आत्म्याला शरीराचे कसलेही बंधन नव्हते. मृत्यूनंतरच्या जगात शरीर नसलेले अनेक आत्मे असल्याचा दावाही पीटरने केला आहे. आपण पाहिलेल्या महिलेचीही फक्त छाया होती. तिला शरीर किंवा चेहरा नव्हता, असेही पीटरने म्हटले आहे. आपण शरीरात असताना आपल्याला एका कपड्यात रस्सीने घट्ट बांधल्यासारखी आपली अवस्था असते. मात्र, शरीरातून मुक्त झाल्यावर आपल्यावर कोणतीच बंधने नसल्याचेही पीटरने सांगितले. काही महिन्यांपूर्वी इवा नावाच्या एका महिलेनेही आपला निअर डेथ एक्सपिरिअन्स शेअर केला होता. मृत्यूनंतर आपल्याला शरीराचे कोणतेही बंधन नसते. आपण बंधनमुक्त असतो. तसेच मृत्यूनंतरचे जग आपल्याला आकर्षक वाटल्याचेही ती म्हणाली. या अनुभवानंतर आपल्याला मृत्यूची असलेली भिती नष्ट झाल्याचेही इवा यांनी सांगितले.

























































