काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका, हत्येचा कट रचला जातोय..गायिका वैशाली माडेची खळबळजनक पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने-माडेने फेसबुक पोस्ट टाकून खळबळ उडवली आहे, तिने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यात आपल्याविरुद्ध हत्येचा कट रचला जात असल्याचा खुलासा केला आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु झालीय.

वैशाली माडेच्या या पोस्टवर वेगवेगळ्या स्तरातून काळजीचे मेसेज येत आहेत. अनेकांना तिची काळजी वाटू लागली आहे. काहींनी पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिलाय, काहींनी ताई काळजी करु नकोस आम्ही तुझ्या पाठिशी आहोत असे सांगितले आहे, तर काहींनी थेट आपले नंबर शेअर करुन मदत लागेल ती करू असेही सांगितले आहे.

 

फेसबुक पोस्टमध्ये काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. अशी पोस्ट शेअर केल्यावर तिच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले आहेत.

वैशालीने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिच्याकडे विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे या धमक्या राजकीय क्षेत्रातून तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.