अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास सक्तमजुरी

667

सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पनवेल सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. कन्हैयालाल पाल (वय 21) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सदर घटना पनवेल येथील लक्ष्मीनगर वसाहत परीसरात घडली होती. 18 डिसेंबर 2014 रोजी आरोपी कन्हैयालाल पाल याने पिडीत मुलीला चहा पिण्याच्या बहाण्याने स्वताच्या घरी बोलावले, आणि तिच्यावर बलात्कार केला. पिडीत मुलीच्या आईने यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतर आरोपी कन्हैयालाल याचे विरोधात भादवी कलम 376, 506 आणि पॉस्को कायद्यातील कलम 3.4.5 (एम) आणि 6 कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी अतिरीक्त सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या न्यायालयात झाली. यावेळी शासकीय वकील म्हणून अश्विनी बांदीवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण 10 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पीडित मुलगी, तीची आई, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासिक अंमलदार सुनील आखाडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासकीय वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. आणि आरोपी कन्हैयालाल पाल याला भादवि 506, आणि पोस्को कायद्यातील कलम 3, 4, 5 एम आणि 6 कलमानुसार 10 वर्षं सक्त मजुरीची शिक्षा आणि एकूण 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

आपली प्रतिक्रिया द्या