
संग्राम चौगुले
वजन कमी करणे आणि फॅट कमी करणे यात बहुतांश लोकांमध्ये चुकीच्या समजुती आहेत. जिममध्ये जाणारे लोक एकतर वजन कमी करण्यासाठी तिथे जातात किंवा वजन वाढवण्यासाठी… पण वजन केवळ आकडे आहेत. हे कुणीच ध्यानात घेत नाही. कारण वजनाचा तुमच्या फिटनेसशी काहीही संबंध नाही. बरेच लोक दिसायला जाडजूड असतात, पण त्यांचे वजन कमी असते तर बरेच लोक दिसायला बारीक असतात, पण त्यांचे वजन बऱयापैकी जास्त असते.
खरे तर फिटनेस चांगला ठेवायचा असेल किंवा फिट राहायचे असेल तर शरीरातील फॅट कमी केला पाहिजे. तो जास्त असेल तर अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. उदा. शरीरात फॅट वाढलेला असेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे शुगर नियंत्रित राहत नाही. मग मधुमेहासारख्या आजारांना बळी पडावे लागते. मधुमेह एकदा झाला की, शरीरात अनेक मोठे बदल होऊ लागतात. म्हणजे हार्मोन्स अनियंत्रित होतात. जादा फॅटमुळे वजनही वाढते आणि त्यामुळे मग पाठदुखी, सांधेदुखी, खांदे दुखणे सुरू होते. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे की, वजन कमी करायचे, पण ते फॅट कमी करूनच…
वजन कमी करायचे म्हणून बहुतेक लोक जेवण कमी करतात. पण ते न्यूट्रिशन्सकडे साफ दुर्लक्ष करतात. धावणे, चालणे या व्यायाम प्रकारांवर लक्ष केंद्रित करतात, पण हे करत असताना ते ठरावीक आहार घेत नाहीत. कारण त्यांना वजन कमी करायचं असतं. त्यामुळे त्यांचं वजन कमी होतं खरं, पण ते फक्त मशीनवर कमी दिसतं. जेवणच कमी केल्यामुळे शरीरातील फॅट तसाच राहतो. स्नायूंना नुकसान पोहोचते. त्यामुळे दिवसभराची नेहमीची कामे करणंही त्यांना जड जातं. अशावेळी माणूस खरा अनफिट होतो. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर फिटनेस राखायचा तर वजन कमी करणं नव्हे, तर फॅट कमी करणे…
चांगला फिटनेस हवा असेल तर दिवसातून किमान अर्धा तास व्यायाम आणि संतुलित आहार घ्यावा लागेल. आपल्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या आणि त्या त्या ऋतूमधील फळे असणे गरजेचे आहे. मग फ्रेश मटन, अंडी, दूध, मोड आलेली कडधान्ये… या सगळ्या गोष्टींचा समावेश असायला हवा. कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होते खरे, पण त्यामुळे आपण अनहेल्दी होतो. पण फॅट कमी करणं हे विशिष्ट आहारामुळे शक्य आहे. ज्यांचा आहार नेहमीच लो-कॅलरीड असतो त्यांच्या शरीरात फॅट वाढत नाही. जेवणात तळलेले आणि गोड पदार्थ टाळायला पाहिजेत. या डाएटबरोबर दिवसातून अर्धा तास कुठलाही एखादा व्यायाम प्रकार करायचा. म्हणजे मग आयुष्य आरोग्यपूर्ण आणि फिट जगता येईल.
आरामही महत्त्वाचा!
फॅट कमी करणं साधारणपणे तीन गोष्टींवर अवलंबून असतं. व्यायाम, डाएटिंग आणि आराम. व्यायाम म्हणजे जिममध्ये किमान ४५ मिनिटे ते १ तास व्यायाम करायचा. तोही कार्डिओ आणि स्ट्रेंग्थ यांचं संगतवार मिश्रण असलेला व्यायाम असला पाहिजे. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू बळकट होतात. आपली कार्यक्षमता वाढते आणि स्नायूंमधील फॅट कमी होते, तर कार्डिओमुळे हृदय आणि फुप्फुस यांची क्षमता वाढते. आपला स्टॅमिना वाढतो आणि एकूणच शरीरातील वाढलेला फॅट जाळायला सुरुवात होते. पण हे कधी? जर तुमचा आहार योग्य प्रमाणात असेल तर… म्हणजेच हाय प्रोटिन, लो कार्ब आणि लो फॅट यामुळे आपण बारीक नाही तर चांगले दिसतो, आपला फिटनेसही चांगला होतो आणि आपण फिट होतो.























































