कवडसे : रिती ओंजळ मनाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>महेंद्र पाटील

कधी तरी मनाला विचारून पाहावे, ते का बेचैन असते. सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होऊनसुद्धा ते उदासीन होते. स्वतःला जगाच्या गर्दीत एकटे समजते, तर कधी दूर दूर चालत जाते. त्याचे असे विसंगत वागणे त्यालाही कळत नसते, पण तरीही ते आपल्या वाटेवरून चालत असते. कधी काही गोष्टी मनासारख्या होतात, तर कधी मनाविरुद्ध होतात. मनाविरुद्ध झालेल्या गोष्टीचे दुःख मनात जपून आपले मन जगू लागते. हळूहळू काळ पुढे सरकत जातो. आयुष्याच्या वाटेवर खूप सारी वळणे येतात आणि खूप काही देऊन जातात. कधी मन सुखावते, कधी मन उदास होते. प्रत्येकालाच आपल्या मनाला काय हवे आणि काय नको हे कळतेच असे नाही.

अनुभवाच्या वाटेवर भेटणारा प्रत्येक प्रवासी काही ना काही देऊन जात असतो आपल्याला, पण मन समाधानी नसल्यामुळे त्याचा शोध सुरू असतो. कधी सुखाचा तर कधी हरवलेल्या क्षणांचा. कधी काळी अनुभवलेल्या गोड गुलाबी थंडीतली कोवळी पहाट, त्यानंतर येणारी सूर्याची सोनेरी किरणे, गर्द झाडांच्या गर्दीतून दिसणारे त्याचे कवडसे, धूसर संध्याकाळी मावळतीला जाणारा सूर्य आणि गवतावर अलगदपणे पडलेले दव. सर्व काही मन आपल्या ओंजळीत जमा करू पाहते. जितके जमेल तितके सुख आपल्या पदरी यावे, असे त्याला वाटत राहते, पण जर काही काळ याच गोष्टी दुरावत गेल्या की, आपले मन लगेच बेचैन-उदासीन होते आणि हळूहळू सुखाचे क्षण आपल्यासाठी लिहिलेलेच नाहीत, असा विचार करत धुमसत राहते, तर कधी शांत होते. त्याच्या अंतरीच्या वेदना कुणाला समजत नाहीत आणि तेही सांगत नाही. एकेक करत दिवस निघून जातात. मग एक दिवस अशी पहाट येते, जी आपल्या मनाला पुन्हा नव्या वळणावर घेऊन जाते. त्या क्षणाची वाट पाहत अनेक दिवस, अनेक वर्षे सरून गेलेली असतात. तो क्षण त्या पहाटेच्या किरणांसोबत आपल्या दारी आलेला असतो आणि आपण त्याला चक्क ओळखत नाही. कारण इतकी वर्षे मनात बाळगलेले ध्यास आणि जपलेली स्वप्ने मनातच निद्रिस्त झालेली असतात. त्या स्वप्नांना जागे करण्याची वेळ येते. त्या नव्या आशेच्या किरणांमध्ये आणि सुख-दुःखात न्हाऊन निघालेल्या मनाची ओंजळ मात्र अजूनही रिती आहे, हे आपल्याला उमगते. एकेक करत जेव्हा ते क्षण आपल्याभोवती जमा होऊन, आपल्या मनाचा ताबा घेऊ लागतात, तेव्हा सुरुवातीला मन त्यांचा स्वीकार करत नाही, पण त्यांची चाहूल सुखद वाटते आणि नंतर मन हळूहळू रमू लागते. बघता बघता त्याच गोड क्षणांची गर्दी मनात जमा होते आणि वाटू लागते, कुठेतरी मनाला हवे होते तसेच हे जग आहे. तशीच ही पहाट, रात्र, संध्याकाळ आहे, तेच धुसर धुके, तीच गोड गुलाबी थंडी आणि तेच मनाला जपणारे तरल प्रहर आहेत.

एकेक करत ते गोड क्षण त्यांचे मन आपल्या मनाच्या ओंजळीत जमा करू लागते. कारण मनाच्या ओंजळीत जमा झालेल्या आठवणींशी खेळायला आपल्या मनालाही नेहमीच आवडत आलंय. म्हणूनच मनाला हव्या असणाऱया गोष्टी त्याला मिळाल्या नसल्या तरी ते जगत असते. कारण त्याला मिळत असते, या गोड जपलेल्या क्षणांचे बळ आणि एक आशेचा कवडसा, जो कधी कुठल्याही वळणावर येऊन ओंजळीत, आजन्म पुरतील इतके सुख टाकून जाणारा. त्या सुखांना रवंथ करत मन जगत असल्यामुळे, त्याची ओंजळ रिती होते आणि ती व्हायलाच हवी. कारण नवीन क्षण, नव्या आठवणी जमा करायला जसे एक मन असते तशीच त्या मनाला असते फक्त एक ओंजळ. तीही रिती…

रित्या ओंजळीत माझ्या
असे क्षण साठवावे
सुन्या पहाटेला कुणीतरी
हे क्षण पाठवावे…

– [email protected]