
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विजेने तांडव केला असून गेल्या 24 तासात वीज कोसळून 100 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश लोक बिहारमधील आहेत.
देशात प्रत्येक वर्षी वीज कोसळून हजारो लोकांचा मृत्यू होतो. 2017 मध्ये 2 हजार 885 आणि 2018 मध्ये 2 हजार 357 लोकांचा वीज कोसळून मृत्यू झाला. मात्र वीज कोसळते कशी आणि यामुळे लोकांचा जीव कसा जातो हा प्रश्न आहे. वीज कोसळणे एक नैसर्गिक घटना आहे. जर संपूर्ण जगात कोसळणाऱ्या विजेची मोजणी केल्यास सरासरी रोज 50 ते 100 वेळा वीज कोसळल्याने निदर्शनास येते.

अनेकदा आकाशातून कोसळणाऱ्या विजेचे तापणाम सूर्याच्या तापमानापेक्षा अधिक असते. साधारण कोसळणाऱ्या विजेचे तापमान 17 हजार डिग्री सेल्सिअस ते 27 हजार डिग्री सेल्सियस एवढे प्रचंड असते. तर सूर्याचे तापमान 5 हजार 505 डिग्री ते 10 हजार डिग्री सेल्सियस एवढे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सूर्यापेक्षा विजेचे तापमान जास्त असल्याचे दिसते.

आकाशातून कोसळणाऱ्या विजेचे तापमान जसे प्रचंड असते तसा त्याचा वेग देखील अचाट असतो. कोसळणारी वीज 3 लाख किमी प्रतितास वेगाने खाली येते. याचाच अर्थ सेकंदाला 84 किमी प्रवास वीज करते.

विजेपासून असा करा बचाव
– पाऊस सुरू झाला असेल व तुम्हाला जर वीज कडाडण्याचा आवाज आला; तर प्रथम स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही स्वत:च्या घरांत किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब शिरा. गुरांचा उघडा गोठा किंवा एखादे शेणाचे शेड याखाली थांबू नका.
– एखादी इमारत जवळ नसेल तर झाडाखाली चुकूनही उभे राहू नका.
– एखादी लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळ असेल तर ती तुमच्यापासून दूर फेकून द्या किंवा दूर ठेवून द्या. लोखंडाकडे किंवा तांब्याकडे वीज लगेच (अॅट्रॅक्ट) आकृष्ट होते.
– आकाशांत खूप काळे ढग असल्यास व दूरवरून वीज कडाडण्याचा आवाज येत असल्यास घराबाहेर पडू नका.
– आकाशात वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना टी.व्ही. बंद ठेवा, त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा.
– कंम्प्यूटर बंद ठेवा; फ्रिज बंद ठेवा. शक्यतो विजेच्या सर्व महागडय़ा वस्तू बंद ठेवा व त्यांचे प्लग सॉकेट मधून काढून ठेवा.

























































