नितीशकुमारांची दारूबंदी सौम्य होणार

41

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमध्ये एप्रिल २०१६ पासून अमलात आणलेल्या ‘दारूबंदी’वरून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारने आता ‘घूमजाव’ केले आहे. दारूबंदीचा कठोर कायदा सौम्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्यासाठी पुढील महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात त्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.

दारूचे उत्पादन, विक्री आणि मद्यपान करणाऱ्यांना सध्याच्या कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या शिक्षेत आता कपात केली जाणार आहे. दारू जिथून जप्त केली जाते, त्या जागेचा वा वाहनाचा मालक आणि ताबेदार या दोघांनाही प्रचलित दारूबंदी कायद्याद्वारे शिक्षा दिली जाते. नितीशकुमार यांच्या नव्या निर्णयानुसार जागा अथवा वाहनाच्या मालकाऐवजी फक्त ताबेदारालाच शिक्षा दिली जाणार आहे. तसेच मद्यपान करताना पकडलेल्यांनाही दिलासा दिला जाणार आहे.

आतापर्यंत दारू पिताना आढळल्यास जामीनही देण्यात येत नव्हता. त्याचबरोबर दारुड्यास पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. आता दारुड्यांना जामीन मिळणार आहे. पाच वर्षांची शिक्षा आता फक्त तीन महिन्यांवर आणण्यात आली आहे. दारू निर्मिती, विक्रीचा गुन्हा पहिल्यांदाच करणारास पाच वर्षांची शिक्षा मिळणार आहे. दारू सापडल्यास घर, वाहन तसेच जमीन जप्त करण्यात येणार नाही.

शहा-नितीश यांची ‘नाश्ते पे चर्चा’

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पाटण्यात आज सकाळी संयुक्त जनता दलाचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत न्याहरी केली. त्यानिमित्त त्या दोघांमध्ये पाऊणतास झालेल्या चर्चेनंतर ‘बिहारमध्ये भाजप-जदयु युती अतूट असून एकजुटीने आम्ही लोकसभा निवडणूक लढवू’ अशी घोषणा अमित शहा यांनी केली. येथील लोकसभेच्या सर्वच म्हणजे ४० जागा ‘एनडीए’ जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितीशकुमार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शहा यांनी ‘ज्ञान भवन’ येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार बहुमताने आणायचे आहे. त्यासाठी बिहारच्या ४० जागा जिंकाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या