स्वयंपाकघरातील नळातून पाण्याच्या जागी आली दारू

719

फिर हेराफेरीमध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या तोंडी एक गंमतीशीर वाक्य आहे, ‘सेव्ह वॉटर ड्रिंक बिअर’ या वाक्यावर सारेच हसले. पण कल्पना करा कधी नळातून पाण्याऐवजी दारू आली तर? बऱ्याच तळीरामांची ही एक ‘वाईल्ड फँटसी’ असते. मात्र केरळमधील एका इमारतीतील लोकांनी या फँटसीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. या इमारतीतील सर्व घरातील नळांमध्ये चक्क पाण्याऐवजी दारू वाहू लगाल्याने सर्वांना धक्काच बसला. ही गोष्ट विचाराने जरी मजेशीर असली तरी प्रत्यक्षात हा अनुभव भयंकर असल्याचे इमारतीतील रहिवासी सांगतात.

केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यातील चलाकुडी शहरातील सोलोमन अवेन्यू अपार्टमेंटमधील रहिवाशांना बुधवारी सकाळी पाणी सोडण्यात आले. त्यावेळी आलेले पाणी हे चॉकलेटी रंगाचे होते. सुरवातीला पाईपचा गंज पाण्यात मिसळला असावा असे त्यांना वाटले. मात्र त्या पाण्याचा वासही विचित्र येत होतो. त्यामुळे काहींनी त्या पाण्याची चव घेतली असता पाण्यात दारू मिसळल्याचे समोर आले. ही दारू मोठ्या प्रमाणात मिसळली होती त्यामुले पाणी हे गडद चॉकलेटी रंगाचे झाले होत.

याबाबत सोसायटीतील रहिवाशांनी महानगरपालिकेला कळविले असता त्यांनी या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा त्यांना यात अबकारी विभागाची चूक असल्याचे दिसून आले. या सोसायटीला पाणीपुरवठा होतो त्या विहिरीजवळ मंगळवारी रात्री अबकारी विभागाने जप्त केलेल्या साडे चार हजार लिटरच्या दारूच्या बाटल्या फोडल्या होत्या. त्यातील दारू ही त्या विहिरीतील पाण्यात मिसळली होती. त्यामुळे संपूर्ण सोसायटीला दारूमिश्रीत पाण्याचा पुरवठा झाला. रहिवाशांच्या तक्रारीनंतर महानगर पालिकेने त्यांच्यासाठी पाण्याची सोय केली. तसेच अबकारी विभागाने विहिर पूर्ण साफ करून पाणीपुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत या सोसायटीला पाणी पुरवणार असल्याचे मान्य केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या