श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत ग्रामपंचायत कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भरारी पथकाने दोजणांना ताब्यात घेतले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात बसून हे दोघे मतदारांना पैसे आणि दारूच्या बाटल्या देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत पोलीसांकडून खातरजमा करण्याचे काम सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस यंत्रणेकडून भरारी पथक तैनात करण्यात आली आहेत. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भरारी पथक टाकळी कडेवळीत येथे गेले असता, त्यांनी मतदान केंद्राची पाहणी केली. त्यावेळी मतदान केंद्राच्या बाजूलाच असणाऱ्या ग्रामपंचयत कार्यालयात काही मंडळी दारू आणि पैसे वाटत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यावर पथकाने ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पाहणी केली असता, कार्यालयातील दोघांनी कार्यालयास कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने ग्रामपंचायत कार्यालय उघडले असता, कार्यालयात दोन व्यक्ती दिसल्या. कार्यालयाची झडती घेतली असता, कार्यालयात दोन दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी मद्यप्राशन केले आहे किंवा नाही हे वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, ग्राम पंचायत कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळल्याने व पैसे वाटप होत असल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.




























































