
ज्याच्याशी भांडण झाले त्याचा मुलगा रिक्षात जाऊन बसला या क्षुल्लक कारणावरून निर्दयी रिक्षाचालकाने मुलाचा पाय धरून त्याला हवेत भिरकावत जमिनीवर आपटले होते. क्रौर्याचा कळस गाठणारा वसईतील मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र हादरून गेला. गंभीर जखमी असलेल्या साडेतीन वर्षीय विघ्नेश कोंढारे या चिमुकल्यावर मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू होते. गेले 10 दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे विघ्नेशला जीवदान मिळाले असून तो मृत्यूच्या दाढेतून परतला आहे. डॉक्टर देवदूत होऊन धावून आल्यामुळेच विघ्नेश सुखरूप घरी परतल्याची कृतज्ञता त्याच्या आईवडिलांनी व्यक्त केली.
सातत्यपूर्ण देखरेख आणि वेळेवर उपचार
मुलाला डिफ्यूज अॅक्सोनल इन्ज्युरी झाली होती. जी मेंदूची अत्यंत गंभीर दुखापत मानली जाते. आम्ही त्वरित मेंदूची सूज कमी करण्यासाठी अँटी-एडिमा उपचार आणि झटके टाळण्यासाठी अँटी-कन्व्हल्संट औषधे सुरू केली. सातत्यपूर्ण देखरेख आणि वेळेवर उपचारांमुळे त्याची प्रकृती स्थिर करण्यात आम्हाला यश आल्याचे डॉ. अंकित गुप्ता आणि डॉ. सुशील कुमार यांनी सांगितले.
वसईच्या अनुपम गृहसंकुल या सोसायटीत राहणारे अतुल कोंढारे यांचा त्याच सोसायटीतील रिक्षाचालक संदीप पवार याच्यासोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. 30 मार्च रोजी संध्याकाळी सोसायटीतील काही मुले आवारात खेळत होती. यावेळी अतुल कोंढारे यांचा मुलगा विघ्नेश हाही त्यांच्यासोबत खेळत होता. खेळता खेळता विघ्नेश हा संदीप पवार याच्या रिक्षात जाऊन बसला. हे पाहताच पवारच्या संतापाचा भडका उडाला. जुन्या वादातून त्याने विघ्नेशला रिक्षाबाहेर काढून त्याच्या पायाला धरले आणि त्याला हवेत भिरकावून जमिनीवर आपटले. त्याला मीटर स्टॅण्डवरही भिरकावून दिले. त्यामुळे चिमुकल्या विघ्नेशच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. यानंतर कुटुंबीयांनी विघ्नेशला तत्काळ मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले.


























































