सामना प्रतिनिधी । सांगली
आज जे आंदोलन सुरू आहे यामागे सरकारी यंत्रणाच आहे की काय असा संशय घ्यायला वाव आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. कारण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचे नेतृत्व करणारे जे संदीप गिद्दे आहेत, हे गिद्दे महाराष्ट्राच्या कृषीमहोत्सवाच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रमुख आहेत. एक ठेकेदारच सरकारच्या विरोधात आंदोलन करतो हे न पचणारं आहे, असं शेट्टी म्हणाले.
ही लोकं शेतकरी संपाच्या नावाखाली शेतकरी आंदोलन फोडून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खचवण्याचा प्रयत्न करताहेत. पण आम्ही हे होऊ देणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
शेतकरी संपाला आज अत्यल्प प्रतिसाद मिळाला याचं कारण शेतकरी समाधानी असं कारण नाही तर शेतकऱ्यांमध्ये जो असंतोष आहे त्याला वाट फोडून द्यायला जी सक्षम माणसं हवी आहेत, ती आज आलेली नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
विश्वासघातकी मोदांनी शेतकरी हुसकावून लावतील…
ज्या मोदींनी शेतकऱ्यांना फसवून, शेतकऱ्यांचा विश्वासघात करून सत्ता हस्तगत केली, त्या मोदींना सत्तेवरून हुसकावून लावण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे आणि ते आम्ही निश्चितच करून दाखवू, असा ठाम विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. ‘दैनिक सामाना’च्या saamanaonline या फेसबूक पेजवरून लाईव्ह करताना त्यांनी शेतकरी संप, सरकारची शेतकऱ्यांसंदर्भातील भूमिका, भाजपची पोटनिवडणुकांमध्ये होणारी हार यावर खणखणीत शब्दात आपली भूमिका मांडली.
हे लोक शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीत…
शेतकऱ्यांचं खच्चिकरण करण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत, याचं उदाहरण देताना ते म्हणाले, ‘राष्ट्रीय स्तरावर जे आंदोलन करतात ते काकाजी शर्माजी आहेत त्यांना मी गेल्या वर्षी मंदसौर येथे गोळीबार झाला होता, तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जायला पाहिजे असं मी त्या शर्मांजींना म्हटलं होतं. ते म्हणाले आंदोलनात बळी गेलेले हे खरे शेतकरी नाही, हे गुंडांचे आंदोलन आहे, अशा पद्धतीची भाषा त्यांच्या तोंडी आली. त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की हे लोक शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीत. त्यानंतर मला माहिती मिळाली की हे काकाजी संघ प्रचारक आहेत.’
लोकशाहीची चाड असेल तर हे करून दाखवा…
‘खरं तर देश पातळीवरच्या सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून संसदेचं एक विशेष अधिवेशन भरवावं अशी मागणी आम्ही करतोय. अनेक राजकीय पक्षांनी देखील याला पाठिंबा दिला आहे. मोदींना जर लोकशाहीची चाड असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला मान्यता द्यावी आणि विशेष अधिवेशन भरवावं, असं आव्हान राजू शेट्टी यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ नौटंकी!
विरोधक काम करू देत नाही म्हणून मोदी उपोषण करू शकतात, तर मग त्यांनी शेतकऱ्यांचं अधिवेशन बोलवावं, मग विरोधक कसं कामकाज होऊ देत नाही ते बघू, असा इशाराही त्यांनी दिला. पण तसं होत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ नौटंकी केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
पोटनिवडणुकीतील पराभव म्हणजे लोकांनी याला नाकारायला सुरुवात केली…
देशात शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बळावर हे सरकार निवडून आलं, त्यांची अवस्था काय झाली? आता ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यापैकी १ किंवा २ जागा भाजपला जिंकता आल्या याचाच अर्थ आहे की लोकांनी याला नाकारायला सुरुवात केली आहे. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजीनामा देतो त्याने केलेला त्याग आम्ही वाय जाऊन देणार नाही, अशाच पद्धतीची भूमिका भंडाऱ्याच्या सर्वसामान्य जनतेनं, शेतकऱ्यांनी घेतली, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
पालघरमध्ये जे आता दिसलं तसं पुढच्यावेळी होणार नाही…
खरं तर पालघरमध्येही तसाच निकाल आला असता. पण बहुरंगी निवडणूक झाली. विरोधकांच्या मतामध्ये विभागणी झाली. पण भाजपनं पाठ थोपटून घ्यायचं कारण नाही. कारण पुढच्यावेळी अशा बहुरंगी निवडणुका होणार नाही. एकास एक होतील. त्यावेळी भारतीय जनता पक्षा हा महाराष्ट्रातून नामशेष झालेला दिसेल.































































